शहर
डिसेंबर 2, 2011मुंबईचा ट्रॅफिक
डिसेंबर 21, 2012वैमानिका…
पूर्वीच्या काळी दूरदेशी गेलेला घरातील कमावता पुरुष घरी परतताना बैलगाडीच्या गाडीवानाला वेगाने गाडी हाकण्याची आर्जवं करत असे. आता काळ बदलला. बैलगाडीची जागा विमानांनी घेतली. पण त्या दूरदेशी गेलेल्या व्यक्तीच्या भावना बदलल्या आहेत का?ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/mtuPbhL2XZ4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
नियम कायदे सारे आता झुगारून तू टाक रे
वैमानिका तू ऐक सांगतो विमान वेगे हाक रे || धॄ ||
गेलो तुझ्याच संगे
रंगलो तिथल्या रंगे
परत यायचे माझे
स्वप्न कितीदा भंगे
येर्इन वर्षभरात
म्हणून हलविला हात
तीन वर्षं पण सरली
परते मी देशात
कितीक आल्या चिठ्ठ्या तरीही केली डोळेझाक रे
वैमानिका तू ऐक सांगतो विमान वेगे हाक रे || १ ||
माता दु:खी बैसे
दिवस काढले कैसे
अपत्य दिसले नाही
आले केवळ पैसे
पैसे नकोत तिजला
अश्रूंनी समयही भिजला
आठव येता माझा
जीवनक्रमही थिजला
नको परीक्षा अधिक आर्इची तुला घालतो धाक रे
वैमानिका तू ऐक सांगतो विमान वेगे हाक रे || २ ||
विरह भावना मनी
वाट पाहते सजणी
आठवणीतच झुरते
गुंतून माझ्या वचनी
आठवणी मनी भरता
रूप तिचे ते स्मरता
तळमळतो मी येथे
एका स्पर्शाकरता
ऐकू येते येथवरी मम आर्त तिची ती हाक रे
वैमानिका तू ऐक सांगतो विमान वेगे हाक रे || ३ ||
संधी तुला मिळाली
विमान उडे आभाळी
चुकव मधे कुणी आले
जाऊन वरती खाली
आकाशी तू असता
रूळ नाही ना रस्ता
कशास ऐसा मग रे
वेळ दवडिशी नसता
वेगाने जा तीरासम तू हवेस नाही बाक रे
वैमानिका तू ऐक सांगतो विमान वेगे हाक रे || ४ ||
खाली राहिले जग ते
सभोवती बघ ढग ते
अशी भरारी आपुली
जेथे नसती खग ते
मला नाही पण भान
जार्इ वरती विमान
लवकर गाठून दे तू
मला गंतव्य स्थान
उतर भराऱ्या घेऊन तू जमिनीला लावी चाक रे
वैमानिका तू ऐक सांगतो विमान वेगे हाक रे || ५ ||
नियम कायदे सारे आता झुगारून तू टाक रे
वैमानिका तू ऐक सांगतो विमान वेगे हाक रे || धॄ ||