वैमानिका…
डिसेंबर 7, 2012फिरदौस काश्मीर
जून 7, 2013मुंबईचा ट्रॅफिक
गाणी ऐकणं, फोनवर बोलणं, झोप काढणं, नाश्ता करणं … थोडक्यात सांगायचं तर मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये दर दिवशी काही तास घालवणं हे आपल्यातील अनेकांच्या आता अंगवळणी पडलं आहे. मात्र बाहेरगावची एखादी हौशी व्यक्ती जेव्हा गाडी घेऊन मुंबईत येते तेव्हा काय हाल होत असतील ह्याची कल्पनाच न केलेली बरी …
नवी कोरी गाडी घ्यायची केलीत एवढी घार्इ
आता मुंबर्इ तरी दाखवून आणा म्हणाली मुलं आणि त्यांची आर्इ
अशी निघाली गाडी आमची जसा चौखूर उधळला घोडा
मुंबर्इ जशी जवळ आली तसा वेग होत गेला थोडा थोडा
गाडी परवडली एवढं त्या प्रवासाचं झालं मोल
कारण दर दहा पावलांना आम्ही भरत गेलो टोल
वेशीवर पोहोचेपर्यंतच आमचं गाडी नावाचं घोडं जसं अगदी दमलं
मुंबर्इच्या ट्रॅफिकशी आमचं कधीच नाही जमलं || १ ||
मुंबर्इला गाडीने आलो हे पाहून बायको गालामध्ये हसते
मला वाटलं बायकोच्या गालासारखेच असतील मुंबर्इचे गुळगुळीत रस्ते
काही अंतरावरच पहिल्या खड्ड्याने दिला असा काही दणका
मला वाटलं नक्कीच सरकला माझा एखादा मणका
पुलांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मुलगा बघू लागला वाकून
म्हणाला बघतो दिसतेय का खालून जाणारी गाडी एखादी चुकून
हाडं झाली खिळखिळी आणि उत्साहाने उडणारं मन निम्मं वरमलं
मुंबर्इच्या ट्रॅफिकशी आमचं कधीच नाही जमलं || २ ||
अॅक्सिडंट झाला बहुतेक माझी बायको म्हणाली पुढे बघत सचिंत
आमच्या समोर उभी राहिली गाड्यांची एक भिंत
अशा चौफेर गाड्या जशी इंग्रजांनी वेढलेली लक्ष्मीबाईंची झाशी
मी घाबरून पाहिलं पण आजूबाजूच्यांच्या चेहेऱ्यांवरची हलत नव्हती माशी
सुंदर पावसाळी हवा खात आलो होतो एवढे दूर
पटापट काचा बंद केल्या नाकातोंडात जेव्हा गेला ट्रक्सचा धूर
ट्रॅफिक हलला तेवढ्यात माझ्या पुढच्या गाडीने त्याच्या पुढच्या गाडीला ठोकलं
मुंबर्इच्या ट्रॅफिकशी आमचं कधीच नाही जमलं || ३ ||
पुढच्याच्या पुढच्या गाडीचा मालक होता राजकारणी
त्याने रीतसर सुरू केली पुढच्या गाडीच्या चालकाच्या कुटुंबीयांची विचारणी
बाकीच्या सगळ्या गाड्या पुढे गेल्या लोटलं एक युग
आम्ही आपले तिथेच गप्प गिळून मूग
तिथून सुटलो तरी प्रत्येक नाक्यावर गर्दी होती दाटली
क्लच दाबून दाबून माझ्या गुडघ्याच्या वाटीची झाली ताटली
मुलांनी आणलेले वेफर्स आणि बिस्किटं खाऊनही पोटातील वादळ नाही शमलं
मुंबर्इच्या ट्रॅफिकशी आमचं कधीच नाही जमलं || ४ ||
वन वे नो एंट्री चुकवत इच्छित स्थळी पोहोचण्याचं दिव्य पार पडलं मोठं
फोन करायची सोय नव्हती हिला आपल्या बहिणीला सरप्राइज करायचं होतं
अय्या नवीन गाडी असं म्हणत हिची बहिण आमच्या दिशेने धावली
आणि आमची ही ह्माची देही ह्माची डोळा भरून पावली
तेवढ्यात तिने सांगितलं की आमच्या सोसायटीत बाहेरच्यांना पार्किंग नाही अलाउड
एवढे हॉर्न्स का वाजतायत ह्माचं पडलं एकदम मला गौड
त्या गल्लीत ह्मा दोघींच्या बोलण्यात आमच्या मागे सारं जगच होतं येऊन थांबलं
मुंबर्इच्या ट्रॅफिकशी आमचं कधीच नाही जमलं || ५ ||
मग वणवण फिरलो त्या कॉन्क्रीटच्या जंगलात पार्किंग मिळत नसल्यामुळे
जसा एखादा आदिवासी फिरावा शोधत फळे आणि कंदमुळे
पार्किंग एवढं लांब मिळालं की आमची स्वारी बसस्टाॅपवर येऊन थडकली
बस मिळाली पण तीही च्यायला ट्रॅफिकमध्येच अडकली
आमच्या साडूंना विचारलं काय हो तुमची गाडी कुठे आली नाही दिसून
ते म्हणाले मुंबर्इत गाडी चालवायला मी काय गाढव आहे का केव्हाच टाकली विकून
बायकोने सांत्वन करूनही मग तिथे माझं मनच नाही रमलं
मुंबर्इच्या ट्रॅफिकशी आमचं कधीच नाही जमलं || ६ ||
2 Comments
खूप छान…
धन्यवाद.