फाळणी
ऑगस्ट 5, 2011निसर्ग
२२ एप्रिल हा दिवस ‘जागतिक पृथ्वीदिन’ (International Earth Day) म्हणून साजरा होतो. सध्याच्या विज्ञानाच्या मर्यादांमुळे निदान नजीकच्या भविष्याततरी आपल्यासमोर पृथ्वी ग्रह सोडून दुसरा कोणताही विकल्प उपलब्ध नाही. आपल्यासारख्या शहरातल्या किड्यांना आपल्या सभोवतालचं काँक्रिटचं जंगल म्हणजेच पृथ्वी वाटली तर त्यात नवल नाही. पृथ्वीवरील निसर्गाचं सौंदर्य आणि ऐश्वर्य केवळ काव्यामध्येच राहणार नाही ना? असंच एक निसर्गावरील काव्य, पहा आवडतंय का ते …
धीरगंभीर समुद्र
शांत कधी कधी रूद्र
बाकी सारे क्षुद्र
लीन होती समोरी
रणरणते ते रण
समुद्र वाळूकण
हाळांचे रिंगण
शिक्षा काय अघोरी || १ ||
बर्फाच्छादित पर्वत
रौप्यरूपेरी मिरवत
अक्षर गगनी गिरवत
काव्य साकार करती
नितळ निळे आकाश
सोनेरी प्रकाश
स्वच्छ मोकळ श्वास
भरारते मन वरती || २ ||
मेघ नभी थरथरले
सर सर पाणी झरलेे
नदी नालेही भरले
सचैल भिजली धरा
कोंब नवे अंकुरले
हिरव्या रंगी मुरले
नवीन जीवन स्फुरले
चमत्कार तो खरा || ३ ||
छाया वटवृक्षाची
अन् पाती गवताची
फळे भिन्न स्वादाची
काय अहो आश्चर्य
विहरत गगनी पक्षी
हरिणकांतीची नक्षी
श्वास अडकला वक्षी
पाहून ते सौंदर्य || ४ ||
मातीचा तो गंध
करी मनासी धुंद
सुमनसुवासही मंद
मन माझे बावरे
चंद्र नभी मदमस्त
सूर्योदय सूर्यास्त
अथक घालती गस्त
तुडवित जाती तारे || ५ ||
अहाहा तो निसर्ग
पृथ्वीवरती स्वर्ग
मनी तोष संसर्ग
नयनपारणे फिटे
र्इश्वर नाही दिसला
प्रश्न कुणी हा पुसला
चराचरातच वसला
नतमस्तक हो तिथे || ६ ||