प्रेमाचा पाढा
फेब्रुवारी 14, 2020एकांतवास
एप्रिल 7, 2020स्त्री
आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हा दिवस गेली एकशे दहा वर्षं साजरा केला जात आहे. एकशे दहा वर्षांत बरंच काही बदललं आहे… पण आपल्या पुरुषप्रधान संकृतीत – मुख्यतः समाजाच्या मानसिकतेत – आणखीन बरंच काही बदलण्याची गरज आहे. पुढल्या एकशे दहा वर्षांत तरी ते बदलेल का?!
आदिमानव गुहेत होते केला होता जाळ
‘ती’ आणि ‘तो’ आणि सोबत होतं छोटं त्यांचं बाळ
गुहेबाहेर गुरगुर ऐकून दोघं झाले सावध
दबा धरूनिया बसलं होतं तेथे एक श्वापद
बघती दोघे एकमेकांस मनातूनी घाबरले
अपत्य बघता भीती गिळूनी सज्ज तरी ते झाले
उचलून घेई ती बाळाला कवटाळे उराशी
उचलून पलिता आगीचा तो झेपावे दाराशी
नव्हता तोही वरचढ आणि नव्हती तीही अबला
प्राक्तनामध्ये लिहिला होता प्रसंग त्यांच्या सगळा
त्याच दिवशी पण ठरून गेली सामाजिक वहिवाट
तो चालवितो बाह्यप्रपंच ती घराच्या आत
ममतेपायी सहन करत ती राहीली मानहानी
स्त्रीजन्माची सुरूच आहे अजून करूण कहाणी ॥ १ ॥
युगामागुनी युगे उलटली ऋतू बदलले सर्व
कनिष्ठ ठरवून नारीला पण नरास चढला गर्व
इतुका झाला समय वाहिले पुलाखालूनी पाणी
बळावरी बुद्धीच्या जिंकी अवनी मानवप्राणी
सुसंस्कृतीच्या करित वल्गना जगते मानवजात
स्त्रीजातीच्या हालांवरती कुणी करेना मात
कुणी समजतो गुलाम तिजला चीज प्रजननाची
कुणी पाहतो लंपट नजरी वस्तू भोगाची
नऊ मासाचा जाच देऊनी जन्म घेत असे नर
तरीही स्वत:ला मानून घेतो स्त्रीचा परमेश्वर
कन्या भार्या मातेला तो अघोरतेने छळी
अजूनही गर्भातूनच जाती कितीक स्त्रीया बळी
घुंगट बुरखा पडद्यामागे असते तिची राहाणी
स्त्रीजन्माची सुरूच आहे अजून करूण कहाणी ॥ २ ॥
बाह्यप्रपंची स्त्रीने येता मोडे समाजरचना
भुलत नाही पण समर्थ नारी पुरूषांच्या ह्या वचना
बदलत आहे परिस्थिती बघ आता आधुनिक जगती
पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया जगती
क्षेत्र वगळले नाही कोणते करती पादाक्रांत
स्पर्धेला ह्या तोंड द्यायची पडली पुरूषां भ्रांत
मोडून काढी जगतामधली पुरूषी मक्तेदारी
पदोपदी मग पुरूषांना ह्या पडती स्त्रिया भारी
तयार आहे स्त्रीही आता हाती घेण्या पलिता
श्वापदासही सामोरी ती जाईल बघ न भीता
विसरू नको तू एकच पुरूषा प्रमाद केला काही
तुझ्या दिशेने पलिता आणण्या कचरणार ती नाही
पचवून अत्याचार सारखे झाली आता शहाणी
स्त्रीजन्माची बदलत आहे खचितच करूण कहाणी ॥ ३ ॥