बाप्पांचे पर्यावरण
सप्टेंबर 12, 2018शेपटी
नोव्हेंबर 14, 2018साबरमतीचा संत
अल्बर्ट आईन्स्टाईनच्या अमेरिकेतील घरात तीन व्यक्तींच्या तसबिरी लावलेल्या आहेत असं म्हणतात. त्यापैकी दोन आहेत मायकल फॅरेडे आणि जेम्स मॅक्सवेल ह्या शास्त्रज्ञांच्या तर तिसरी आहे महात्मा गांधींची. अशा ह्या जगन्मान्य महात्म्याचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आजपासून सुरु होत आहे. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही आदरांजली…
कष्ट हरण्या जनतेचे साहिले जाच अनंत
लढला शस्त्राविना पाहा साबरमतीचा संत ॥ धृ ॥
रंगभेदी धोरण अवलंबे दक्षिण आफ्रिका
जुलूम करण्या जनतेवरती लागे अहमहमिका
दमनविरोधी एकजुटीची रोवून मुहूर्तमेढ
ठाम उभा राहिला मांडुनी सत्याग्रही भूमिका
मरगळलेला समाज तेथे जाहला मग जिवंत
लढला शस्त्राविना पाहा साबरमतीचा संत ॥ १ ॥
भारतभूला परतुनी आला पाहुनी इथली दैन्या
डरला नाही बलाढ्य इथल्या ब्रिटिशांच्याही सैन्या
ढवळून काढी जनता झाली होती जी हतबल
निर्भिडतेने ललकारी सरकारी औदासिन्या
सरकारासी जाब विचारी जे जे प्रश्न ज्वलंत
लढला शस्त्राविना पाहा साबरमतीचा संत ॥ २ ॥
सौम्य भाव वदनी वसती अन् शरीरयष्टी किरकोळ
भारदस्त जरी आवाज नव्हता कणखर तरीही बोल
बटुमूर्ती ती पाहून हसती इंग्रज हिणवून त्याला
किंमत लागे मोजावी सत्तेचे देऊन मोल
अखंड चळवळ चाले नाही देत काही उसंत
लढला शस्त्राविना पाहा साबरमतीचा संत ॥ ३ ॥
सत्य अहिंसा साधेपण अन् श्रद्धा परमेश्वरी
लढण्याकरता हेच कवच अन् हीच शस्त्रंही खरी
समाजकारण धर्मातीत अन् सर्वसमावेषी
गोरगरीब अन् दलितजनांची करतो तो चाकरी
हिंसाचारी जर्जर जगती पसरे कीर्ती दिगंत
लढला शस्त्राविना पाहा साबरमतीचा संत ॥ ४ ॥
भले लाभले देशभक्त भारतवर्षाला थोर
जेरीस येऊन उलथून गेली ब्रिटिश सत्ता मुजोर
स्वातंत्र्याचा तळपू लागे क्षितिजावरती सूर्य
कार्य जणू संपवून गेला मृत्यूला समोर
देशबांधवाहाती मृत्यू राहिल एकच खंत
लढला शस्त्राविना पाहा साबरमतीचा संत ॥ ५ ॥
महान त्याच्या कार्याची ठेविली नाही जाणीव
दूषण देती आजही त्याला वाटे त्यांची कीव
धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा पायाच बनवला त्याने
साकारे मग त्यावर आधुनिक मूर्ती ती ताशीव
ऐसा लाभे राष्ट्रपिता तो देश भाग्यवंत
लढला शस्त्राविना पाहा साबरमतीचा संत ॥ ६ ॥
कष्ट हरण्या जनतेचे साहिले जाच अनंत
लढला शस्त्राविना पाहा साबरमतीचा संत ॥ धृ ॥