डीपी
सप्टेंबर 15, 2023नग्न सत्य
मे 5, 2024सहावं महाभूत
आज आंतरराष्ट्रीय दारिद्र्यनिर्मुलन दिन आहे. आदिमानव स्वतःचं अन्न स्वतःच गोळा करून किंवा शिकार करून मिळवत असे. मग शेतीचा शोध लागला. आता शेतीकरता मेहनत घेतल्यावर जमिनीवर मालकी हक्क येणारच. आणि इथेच सगळी गोची झाली. पुढे ह्या मालकी हक्काच्या भानगडीतूनच सहाव्या महाभुताचा जन्म झाला..
परमेश्वर कबूल करणार नाही कधी हे सत्य
पण पृथ्वी ग्रह आहे त्याचं लाडकं ते अपत्य
एवढा मोठा ब्रह्मांडाचा मांडला हा पसारा
लक्ष मात्र असतं त्याचं पृथ्वीकडेच नित्य ॥
जीवसृष्टी निर्माण करणं जेव्हा ठरलं होतं
परमेश्वरास ठाऊक होती सारी गुंतागुंत
ठेवण्यासाठी व्यवस्था ह्या गुंतागुंतीची
त्याने मग नेमली तिथे पंचमहाभुतं॥
जल अग्नी वात धरणी आकाश निळे छान
जीवसृष्टीकरता होतं प्रत्येकच वरदान
मदत करणं जीवनाला त्यांचं मुख्य कार्य
शिक्षा करत त्यांचा कोणी केला जर अपमान ॥
जीवसृष्टी प्रगत झाली आली मानवजात
जीवसृष्टीच्या कारभारालाच घातला त्यांनी हात
धोकादायक ठरू लागले इतर जीवांकरता
एक एक करत महाभुतांवर केली त्यांनी मात ॥
सोडवणं गरजेचं होतं प्रश्न आला ऐसा
देवासंगे पंचमहाभुतं विचार करती कैसा
बराच विचार करून देवा सुचली शक्कल नामी
सहावं महाभूत त्याने निर्माण केला पैसा ॥
फक्त मानवजातीकरता महाभूत हे खास
थोड्याच दिवसांत सारे मानव झाले त्याचे दास
पंचमहाभुतं मानती देवाचे आभार
आता नाही होणार आम्हा मानवाचा त्रास ॥
बाकी महाभुतांप्रमाणेच पैसाही मग वागला
जो तो मानव त्या पैशाच्या मागे धावू लागला
इतकंच काय देवही आता आठवू येईना
विचार करेना काही मानव आता पुढला मागला ॥
नवीन महाभुतास आता हाताशी धरून
मानव करतो नाश सृष्टीचा नव्या दमाने फिरून
परमेश्वराहूनही मोठा झाला आता पैसा
त्याच्या महिम्यापुढे परमेश्वरही जाई हरून ॥
स्वर्गामधून परमेश्वर पृथ्वीकडे पाही
आवर आता घालू कसा त्याला समजत नाही
डोळ्यांसमोर ह्रास पावतंय त्याचं लाडकं मूल
महाभुतांचा देव नाही उपाय सुचत काही ॥