आली निवडणूक
एप्रिल 10, 2019… गोष्टी काही काही
मे 21, 2019सरनौबत
जागतिक हास्यदिनाच्या खळखळून शुभेच्छा! मे महिन्याचा पहिला रविवार जागतिक हास्यदिन म्हणून पाळला जातो. पाश्चिमात्य देशांकडून आलेलं फॅड म्हणून ह्या दिवसाला हसण्यावारी नेऊ नका. ह्या दिवसाचा जन्म चक्क मुंबईत झाला आहे आणि तेही हास्ययोगाच्या (laughter yoga) निमित्ताने! हास्याची निर्मिती योगासारख्या गंभीर कृतीतून होत असेल तर युद्धकथेतून का नाही…
मुक्त सागरी गस्त घालण्या
गलबत बंदरावरून निघे
नवीन खलाशी अचंबितपणे
दर्याचे सौंदर्य बघे
खुशीत होता आधीच तो तर
गलबत त्याचे होते खास
ताफ्यामधले भव्यतम अशी
होती त्या गलबता मिजास
अशा गलबताचा सेनानी साजेसा होता अलबत
असीम शौर्याकरता प्रसिद्ध पराक्रमी तो सरनौबत ॥ १ ॥
टेहळणीचे महत्व मोठे
रक्षण करण्या सीमांचे
खलाशास त्या दुरून दिसले
जहाज मोठे गनिमांचे
त्वरित बातमी घेऊन जाई
करण्या सावध सर्वांना
सरनौबत तो हरखे मिळता
लढण्याकरता परवाना
लढणे त्याचे जीवन होते लढणे होते अन् दैवत
असीम शौर्याकरता प्रसिद्ध पराक्रमी तो सरनौबत ॥ २ ॥
करून गर्जना गगनभेदी मग
करण्या गनिमावरती चाल
खलाशास तो सांगे माझा
घेऊन ये अंगरखा लाल
लेवून अंगरखा तो त्याचा
तुटून पडला जणू अंगार
विजेप्रमाणे तळपू लागे
हातातील त्याच्या तलवार
बघता बघता रसातळाला बुडते गनिमांचे गलबत
असीम शौर्याकरता प्रसिद्ध पराक्रमी तो सरनौबत ॥ ३ ॥
उसंत घेण्या थांबे गलबत
अंगातून निघती वाफा
दुरून दिसला गनिमांचा पण
दहा गलबतांचा ताफा
परत एकदा सरनौबत तो
मागवतो अंगरखा लाल
परत एकदा भिडला गनिमां
नाही चिलखत नाही ढाल
बलाढ्य गनिमा पराभूत केल्यावाचून नाही थांबत
असीम शौर्याकरता प्रसिद्ध पराक्रमी तो सरनौबत ॥ ४ ॥
युद्ध संपता म्हणे खलाशी
गोष्ट एक मज सांगावी
अंगरखा तो घालून येई
शक्ती कशी तव मायावी
हसून सांगतो सरनौबत तो
वार झेलतो छातीवर
अंगरख्याच्या रंगी लपते
रक्त कुणी जर पाहील तर
नौदल माझे लढते जोवर माझ्या जखमा नाही दिसत
असीम शौर्याकरता प्रसिद्ध पराक्रमी तो सरनौबत ॥ ५ ॥
थकले होते सैनिक चालू
होते अन् औषधपाणी
पुन्हा एकदा गनिमी हल्ल्याची
वर्दी आली कानी
चाहूल घेतो सरनौबत तो
दुर्बीण लावी डोळ्याला
उभी ठाकली होती समोरी
शंभर गलबतं हल्ल्याला
पुन: पुन्हा तो पाहे मोठे संकट त्याला असे दिसत
असीम शौर्याकरता प्रसिद्ध पराक्रमी तो सरनौबत ॥ ६ ॥
नवीन खलाशी त्वरित विचारे
आणून देऊ का अंगरखा
तुमच्यासंगे लढून आम्ही
सोडवू गनिमांचा विळखा
बाजूस सारून अंगरखा पण
सरनौबत तो करी विचार
आधी जाऊनी घेऊनी ये रे
माझी ती पिवळी सुरवार
पराक्रमाच्या मर्यादा साऱ्या होत्या त्याला अवगत
असीम शौर्याकरता प्रसिद्ध पराक्रमी तो सरनौबत ॥ ७ ॥