दान
ऑगस्ट 13, 2019हा नाही अहंकार
सप्टेंबर 28, 2019समज
राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! हल्लीच्या आण्विक कुटुंबसंस्थेत मुलं मनाने हळवी होत चालली आहेत. काही मुलं इतरांपेक्षा निराळी असतात. त्यांना सर्वसामान्य परिमाणं लावणं चुकीचं ठरू शकतं. अशा मुलांची मानसिक जडणघडण समजून घेऊन त्यांच्याशी संवेदनशीलने वागणं हे आजच्या पालकांप्रमाणेच शिक्षकांकरताही आव्हान ठरत आहे…ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/ipST9UKV9Ro ह्या ठिकाणी ऐकता येईल.
उजव्याच हाती खावे
डावीकडून जावे
तुमचे हे उजवे डावे
नाही मला समजले ॥ १ ॥
अक्षरे शब्द होती
वाक्येही त्यांची होती
पण अर्थ काय पोटी
नाही मला समजले ॥ २ ॥
अक्षरे थोडी ऐसी
अक्षरे थोडी तैसी
कथतील भाव कैसी
नाही मला समजले ॥ ३ ॥
एक आणि एक दोन
त्रिकोण पंचकोन
हे सर्व ठरवी कोण
नाही मला समजले ॥ ४ ॥
चित्रांमध्येच हसतो
स्वप्नांमध्येच वसतो
अभ्यास काय असतो
नाही मला समजले ॥ ५ ॥
शाळेत आणि घरचे
मज ताडती कधीचे
हसणे कसे चुकीचे
नाही मला समजले ॥ ६ ॥
शाळेत नाही मित्र
घरचेही तेच चित्र
हे वागणे विचित्र
नाही मला समजले ॥ ७ ॥
माशांसवे तरावे
पक्ष्यांसवे उडावे
वर्गात का बसावे
नाही मला समजले ॥ ८ ॥
माझ्यात नाही व्यंग
नाहीच मी अपंग
अलबेले माझे रंग
नाही तुला समजले ॥ ९ ॥
2 Comments
खूप मार्मिक….
तो राजहंस एक…. पण ओळखला आला तर….
अप्रतिम रचना…
धन्यवाद योगिनी..