गुपित
फेब्रुवारी 14, 2019आली निवडणूक
एप्रिल 10, 2019सणावली
सण साजरे करणं हा कोणत्याही संस्कृतीचा अविभाज्य घटक असतो. एखाद्या गावाची, शहराची, राज्याची किंवा देशाची संस्कृती तेथील समाज म्हणजेच लोक ठरवत असतात. त्यामुळे एखादा सण साजरा करण्याकरता जात, धर्म, वय, लिंग, आर्थिक परिस्थिती असे भेद आड येत नाहीत. त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सण त्या समाजाचा सण बनतो. हिंदू बहुसंख्य भारतवर्षातील हिंदूंचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. त्यानिमित्त सादर आहे ही आपल्या सणांची सणावली…
सणावली
नूतन वर्षारंभाची ती गुढी पाहा रोवली
सहस्रकांची संस्कृती भारतवर्षाची सावली
भाग्य आपुले थोर लाभते समृद्ध सणावली
प्रत्येक ऋतूमध्ये ऐसा सण होई साजरा ॥
गुढीपाडवा
जेव्हा येते चैत्राच्या महिन्यात शुद्ध प्रतिपदा
विजय होई सत्याचा जाती टळून साऱ्या विपदा
गुढी नवीन वर्षाची दावी भावी सुखसंपदा
गुढीपाडव्याचा सण होतो त्या दिवशी साजरा ॥ १.१ ॥
ब्रह्मदेव ज्या दिवशी करतो समयाची सुरूवात
रावणास हरवून परतला अवधेचा सम्राट
शालिवाहनांनी अन् केली शकांच्यावरी मात
गुढीपाडव्याचा सण होतो त्या दिवशी साजरा ॥ १ ॥
यूट्यूब – https://youtu.be/EqipUBxIFvI
रामनवमी
चैत्र मास पहिल्या पक्षातील आली असता नवमी
श्रीरामाच्या जन्माची सर्वांस मिळे बातमी
अत्याचाऱ्यांच्या नि:पाताची जगताला हमी
असा रामनवमीचा होतो सण तेव्हा साजरा ॥ २ ॥
यूट्यूब – https://youtu.be/Q6IKhKuaQ0g
महावीर जयंती
सत्य अहिंसा ब्रह्मचर्य अपरिग्रह अस्तेय
राजमहाला त्यागून ठेवी ‘केवल ज्ञान’च ध्येय
षड्रिपूंवरी विजय मिळवूनी राहिला जो अजेय
महावीर स्मरण्यास जयंती सण होई साजरा ॥ ३ ॥
यूट्यूब – https://youtu.be/Cwhl-blGsek
हनुमान जयंती
तेलाचा नैवेद्य ठेव शेंदूर अंगी लावूनी
महाबलीने जन्म घेतला चैत्र पौर्णिमा दिनी
पिता जयाचे पवनराज अन् माता ती अंजनी
जयंतीचा हनुमानाच्या सण होतो मग साजरा ॥ ४ ॥
यूट्यूब – https://youtu.be/bKqKKPmxXT0
महाराष्ट्र दिन
ठेवीत होते मुंबईस महाराष्ट्रातून विभक्त
म्हणून हुतात्मा चौकामध्ये कितीक सांडले रक्त
मोडून गेला विरोध सत्ता झाली कितीही सख्त
जन्म महाराष्ट्राचा सण हा होई आता साजरा ॥ ५ ॥
यूट्यूब – https://youtu.be/Jo68eWqVk1w
अक्षय तृतीया
वैशाखाच्या शुद्ध तृतीयेस युग सुरू झाले त्रेता
जन्म परशुरामाचा झाला हाच पूज्यदिन येता
गंगा अवनीवर आणण्याला यश आले भगीरथा
अक्षय तृतीयेचा सण होतो त्या दिवशी साजरा ॥ ६ ॥
यूट्यूब – https://youtu.be/eiajo6FUVb4
बुद्ध पौर्णिमा
गरिबी पीडा बघून निघाला मन करण्याला शुद्ध
शिकवण देई शत्रूपुढतीही होऊ नको तू क्रुद्ध
विचार त्याचे समजून हो सम्राट अशोकही मुग्ध
नवव्या अवताराची जयंती सण होई साजरा ॥ ७ ॥
यूट्यूब – https://youtu.be/LiSDRpNMQZQ
रमजान ईद
मास शव्वाल सुरु होतसे ईद अल्-फित्रच्या दिवशी
गोरगरीबांस दान म्हणुनी ते जकात अल्-फित्र देशी
रमजानाचे उपास संपून मेजवानी मग खाशी
इस्लामाला प्रमुख असा हा सण होई साजरा ॥ ८ ॥
यूट्यूब – https://youtu.be/9T7rOPvDB9M
वट पौर्णिमा
वाट पाहतो सत्यवान तो कधी येईल मरण
यमराजाला रोखे पत्नी करण्यास प्राणहरण
निष्ठेने परतवी मरण कर सावित्रीचे स्मरण
म्हणून वटपौर्णिमेचा सण हो त्या दिवशी साजरा ॥ ९ ॥
यूट्यूब – https://youtu.be/mIGzOeJqjEQ
आषाढी एकादशी
आषाढ शुद्ध एकादशीची महान आहे ख्याती
चातुर्मासाचे व्रत ठेवा विष्णू झोपी जाती
पंढरपूरास जाती वाऱ्या विठ्ठल महिमा गाती
एकादशीचा आषाढातील सण होई साजरा ॥ १० ॥
यूट्यूब – https://youtu.be/tgUBZxIjkFY
गुरू पौर्णिमा
आषाढ पौर्णिमेस जन्मले गुरूवर्य मुनी व्यास
गुरू:साक्षात परब्रह्म आपुली परंपरा खास
ज्ञानाशिवाय कसा व्हायचा मानवाचा विकास
गुरूपौर्णिमेचा सण होतो ह्यासाठी साजरा ॥ ११ ॥
यूट्यूब – https://youtu.be/mmRVh-xLgBc
नाग पंचमी
पवित्र श्रावण शुद्ध पंचमी पूजले जाती नाग
पर्जन्यी वसण्यास शोधती घर अंगण अन् बाग
लाह्या आणिक दुध देऊनी शांत करावा राग
नाग पंचमीचा सण होतो ह्यासाठी साजरा ॥ १२ ॥
यूट्यूब – https://youtu.be/gvMBKMOYVUM
बकरी ईद
इब्राहीम दे बळी पुत्राचा ईश्वर आज्ञा देता
ईद अल्-जुहाचा दिन हा मोठा ईश्वरनिष्ठा स्मरता
दगड मारुनी सैतानाला पळवून लावा पुरता
सर्वश्रेष्ठ सण इस्लामाचा असा होई साजरा ॥ १३ ॥
यूट्यूब – https://youtu.be/TEFF6kKeLg0
नारळी पौर्णिमा
पूजा सागराची करण्याला श्रावण पूनम रात
नारळ अर्पण सागरास कोळ्यांची गीते गात
धार तुपाची सोडून खाती सर्व नारळी भात
नारळी पौर्णिमेचा सण हो असाच तो साजरा ॥ १४.१ ॥
आज बांधते बहिण भावास पवित्र धागा राखी
स्मरून राखीला द्रौपदीसवे श्रीकृष्ण उभा ठाकी
विष्णूकरिता लक्ष्मी बळीराजाची करूणा भाकी
नारळी पौर्णिमेचा सण हो असाच तो साजरा ॥ १४ ॥
यूट्यूब – https://youtu.be/s2Vs6nDReNU
स्वातंत्र्य दिन
परकीयांची सत्ता हृदयी असह्य पेटे आग
स्वातंत्र्याचे सैनिक करती कल्पनातीत त्याग
एक दिवस मग कपाळावरील पुसला गेला डाग
त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा सण होई साजरा ॥ १५ ॥
यूट्यूब – https://youtu.be/awdgG3h9qrk
पतेती / नवरोज
पतेतीच्या दिवशी पापांचा पश्चात्ताप करावा
नवरोजाच्या वर्षारंभी किंतु मनी न उरावा
जाऊन अग्यारीत ईश्वरा चरणी दिवस सरावा
मन करण्याला पवित्र ऐसा सण करती साजरा ॥ १६ ॥
यूट्यूब – https://youtu.be/uaeEJ8uXz4k
गोकुळाष्टमी
श्रावण कृष्ण अष्टमीस श्री अवतार येई आठवा
मथुरा गोकुळ वॄंदावन अन् इंद्रप्रस्थी पांडवा
बाळकृष्ण हा घेई समस्त लोकांची वाहवा
म्हणून गोकुळाष्टमीचा सण हा तेथ होई साजरा ॥ १७.१ ॥
मराठमोळ्या मनास आवडी भारी गोपाळकाला
दहीहंडीच्या खाली गोविंदाचा जमाव आला
प्रत्येकाच्या तोंडी नाद गोविंदा रे गोपाळा
अशा प्रकारे गोकुळाष्टमीचा सण हो साजरा ॥ १७ ॥
यूट्यूब – https://youtu.be/dQb_gKDCRM4
बैल पोळा / पिठोरी अमावस्या
पिठोरी अमावस्या येता संपे श्रावण मास
शेतकरी राखून ठेवितो बैलांसाठी खास
बैलांच्या तोंडात भरविती पुरणपोळीचा घास
अशा प्रकारे पोळ्याचा सण होतो मग साजरा ॥ १८ ॥
यूट्यूब – https://youtu.be/H8S7uAhFByA
हरितालिका
भाद्रपदातील शुद्ध तृतीयेस पार्वतीचे पूजन
हिरव्या सृष्टीला ती देवी देत असे जीवन
पर्जन्याचा आशिष मिळुनी होतसे नवीन सृजन
असा हरितालिकेचा होतो सण तेव्हा साजरा ॥ १९ ॥
यूट्यूब – https://youtu.be/yO7SxSoHpI8
गणेश चतुर्थी
भाद्रपदाच्या मासी येते जेव्हा शुद्ध चतुर्थी
महाराष्ट्राच्या घराघरातून वसते मंगलमूर्ती
आबालवॄद्धांना हे बाप्पा भुरळ घालती पुरती
तेध गणेशचतुर्थीचा सण सकल करती साजरा ॥ २०.१ ॥
एकवीस अकरा सात दीड अन् कुठे वसे दिन पाच
मराठमोळ्या मनामधील जो आद्यदेव तो हाच
कुठे बसुनिया खातो मोदक कुठे रंगी करी नाच
तेध गणेशचतुर्थीचा सण सकल करती साजरा ॥ २०.२ ॥
काढती लोकसंघटन करण्या लोकमान्य ही तोड
पुराणास मग इतिहासाची अशी मिळाली जोड
समाज झाला एकत्रित अन् सण झाला हा गोड
तेध गणेशचतुर्थीचा सण सकल करती साजरा ॥ २०.३ ॥
रोज चालते पूजन गणपती बाप्पाला मोरया
विसर्जनाला वाटे वाईट निरोप अन् द्यावया
अश्रूपूर्ण डोळे म्हणती पुढल्या वर्षी लवकर या
तेध गणेशचतुर्थीचा सण सकल करती साजरा ॥ २० ॥
यूट्यूब – https://youtu.be/Adq10PA1G2I
मोहर्रम
इस्लामी वर्षाचा पहिला महिना ह्याचे स्थान
रमजानाच्या नंतर पवित्र महिना ऐसा मान
शोक पाळती मोहर्रममध्ये ठेवा ह्याचे भान
मुख्य मास पण सण म्हणुनी हा होत नाही साजरा ॥ २१ ॥
यूट्यूब – https://youtu.be/rmQ1A8xNDkI
अनंत चतुर्दशी
भाद्रपदातील शुद्ध चतुर्दशी श्रीविष्णूंची महती
शेषनाग अन् लक्ष्मीसंगे सर्व तयांना स्मरती
ह्याच दिवशी अन् विसर्जनाला जाती देव गणपती
तेव्हा अनंत चतुर्दशी सण मग होई साजरा ॥ २२ ॥
यूट्यूब – https://youtu.be/0U6WueempFg
घटस्थापना / नवरात्री
अश्विन शुद्ध प्रतिपदा दुर्गादेवी स्थापन होते
भोंडल्याची गाणी गाताना रातही पटकन सरते
नवरात्रींच्या पूजांमध्ये अपार पुण्य मिळे ते
अशा प्रकारे नवरात्रीचा सण होई साजरा ॥ २३ ॥
यूट्यूब – https://youtu.be/zB4GPjoZHp4
दसरा
अश्विन मासी शुद्ध दशमीस येई दसरा सण
दुर्गेने केले ह्या दिवशी महिषासुरमर्दन
ह्याच दिवशी श्रीराम मारितो असुरराज रावण
म्हणूनच दसऱ्याचा सण होतो ह्या दिवशी साजरा ॥ २४.१ ॥
पांडवबंधू येती संपवूनी वर्ष अज्ञातवास
सिमोल्लंघनासाठी ठेविला राखून दिन हा खास
शमिवृक्षाची पाने लुटुनी श्रीखंड खावे ठास
अशा प्रकारे दसऱ्याचा सण होतो मग साजरा ॥ २४ ॥
यूट्यूब – https://youtu.be/DENFmRiQa78
कोजागिरी पौर्णिमा
अश्विन पौर्णिमेस पुसे धनलक्ष्मी को जागरती
धनलाभाची संधी सारे रात जागरण करती
खेळ खेळूनी दूध पिऊनी अंगणी गच्च्यांवरती
अशा प्रकारे कोजागिरीचा सण होई साजरा ॥ २५ ॥
यूट्यूब – https://youtu.be/qlGVkfcRD3U
दिवाळी
अश्विन मास संपता रघुवर वनवासाहून आले
अभूतपूर्व स्वागत मग त्यांचे अयोध्येमध्ये झाले
दीप प्रज्वलन करूनी सारे नगरच उजळूनी गेले
पाच दिवस अन् दिवाळीचा सण मग होई साजरा ॥ २६.१ ॥
असे सुट्टी शाळेस आणखी गोड थंडीचा काळ
चकली चिवडा लाडू आणिक करंजीचा फराळ
कंदील पणत्या रांगोळी अन् फटाक्यांचा उजाळ
पाच दिवस मग दिवाळीचा सण असा होई साजरा ॥ २६.२ ॥
अश्विन शुद्ध त्रयोदशीला धनलक्ष्मी ये दारी
उत्साहाने दिवे लावूनी पूजा करी व्यापारी
धन्वंतरीची पूजा आरोग्य मागती नर-नारी
पहिल्या दिवशी दिवाळीचा सण असा होई साजरा ॥ २६.३ ॥
अभ्यंगस्नान करण्यास नरक चतुर्दशीला उठणे
राजेशाही स्नान कराया तेल सुगंधी उटणे
नरकसुराच्या नि:पाताला चिरटफळाचे फुटणे
दुसऱ्या दिवशी दिवाळीचा सण असा होई साजरा ॥ २६.४ ॥
अश्विन मासी अमावस्येस होते लक्ष्मी पूजन
लक्ष्मी आणि गणपतीस ह्या दिनी पूजती जन
बत्तासे लाह्या नैवेद्यी वाढे तुमजे धन
तिसऱ्या दिवशी दिवाळीचा सण असा होई साजरा ॥ २६.५ ॥
कार्तिक शुद्ध प्रतिपदा बळीला वामन ये आडवा
ह्याच दिवशी जन सकल पाळती दिवाळीचा पाडवा
पत्नीस भेटवस्तू देऊनिया प्रेमयोग वाढवा
चतुर्थ दिवशी दिवाळीचा सण असा होई साजरा ॥ २६.६ ॥
भाऊबीजेच्या दिवशी मॄत्यू वैकुंठाची हमी
कारण ह्या दिनी बंधू यमाचे अतिथ्य करते यमी
बंधू घेती काळजी भगिनीस पडो ना काही कमी
पंचम दिवशी दिवाळीचा सण असा होई साजरा ॥ २६ ॥
यूट्यूब – https://youtu.be/F3aXAoDJszg
कार्तिकी एकादशी / तुलसी विवाह
कार्तिक शुद्ध एकादशीचा दिन मोठा पावन
कृष्णासंगे लग्नास सजे तुळशी वॄंदावन
मुहूर्त काढा संपे चातुर्मासाचे पालन
तुळशीच्या लग्नाचा सण हो त्या दिवशी साजरा ॥ २७ ॥
यूट्यूब – https://youtu.be/5SjziRyYvH4
ईद-ए-मिलाद
पैगंबर हजरत मोहम्मदांचा जन्मदिवस हा मोठा
अनुयायांच्या आनंदाला कसा असावा तोटा
बंधुत्वाने जवळ येती कुणी थोर असो वा छोटा
मित्र-आप्तांस आलिंगुनी हा सण करती साजरा ॥ २८ ॥
यूट्यूब – https://youtu.be/AdBwJP4wxH8
गुरु नानक जयंती
शिखांचे गुरु पहिले नानक महती त्यांची मोठी
गुरु ग्रंथसाहेबच्या आर्या प्रत्येकाच्या ओठी
लंगरातले जेवण पोहोचे प्रत्येकाच्या पोटी
भक्ती आणि सेवा तत्त्वांवर सण होतो साजरा ॥ २९ ॥
यूट्यूब – https://youtu.be/CXOTh409Hv4
चम्पा षष्ठी
मार्गशीर्ष पहिल्या षष्ठीला चम्पा षष्ठी आली
जेव्हा दानव मणी आणि मल्ला ‘ग’ ची बाधा झाली
तेव्हा शिव खंडोबारूपे कंठस्नान त्यां घाली
वाघ्या मुरळी संगे हा सण म्हणून होई साजरा ॥ ३० ॥
यूट्यूब – https://youtu.be/COqI9S8seuk
दत्तजयंती
मार्गशीर्ष पौर्णिमेस येई दत्तात्रेय जयंती
ब्रह्मा विष्णू महेश ह्यांचा अवतार त्यास म्हणती
मोक्ष मिळविण्या पूज्य देवता होई त्यांची गणती
दत्तजयंतीचा सण होई म्हणून मग साजरा ॥ ३१ ॥
यूट्यूब – https://youtu.be/mbkCEt8f-Ho
नाताळ
ख्रिस्तजन्म झाला ह्या दिवशी न्यारी अशी कहाणी
भेटवस्तू मिळती लहानांना मोठ्यांस मेजवानी
चर्चमध्ये जाऊन गाती येशूच्या स्तुतीची गाणी
जगभरात नाताळ सण पाहा असा होई साजरा ॥ ३२ ॥
यूट्यूब – https://youtu.be/TZLij551P5c
मकरसंक्रांत
चौदा जानेवारी संक्रांतीचा सण तो आला
तिळगुळ देऊन सांगा सर्वां आता गोड बोला
चंद्रकला नेसूनी बोलवा हळदी कुंकवाला
संक्रांतीचा सण हो अशा प्रकारे अन् साजरा ॥ ३३ ॥
यूट्यूब – https://youtu.be/S_9GvhUzYKo
प्रजासत्ताक दिन
भारतवर्षी आले ह्या दिवशी कायद्याचे राज्य
धर्म-जातीच्या भिंती झाल्या अमुच्याकरता त्याज्य
मानवतेच्या शत्रूंस दावू अमुचे बळ अविभाज्य
प्रजासत्ताक दिन करू मोठ्या दिमाखात साजरा॥ ३४ ॥
यूट्यूब – https://youtu.be/mRn-y9ySKiI
महाशिवरात्र
माघी कृष्ण त्रयोदशीला येई महाशिवरात्री
बेल वाहूनी प्रसन्न होईल शिवशंभो ही खात्री
उपास करूनी दिवसभराचा दान करा सत्पात्री
असा महाशिवरात्रीचा सण तेथ होई साजरा ॥ ३५ ॥
यूट्यूब – https://youtu.be/x-_SIcSuxZQ
होळी
फाल्गुन पूनम होळी म्हणजे रंगांचा वर्षाव
बहिण हिरण्यकश्यपूची होलिका तिचे ते नाव
तिच्यापासूनी प्रल्हादाचा विष्णू करी बचाव
होळी पेटवून स्मरण करविण्या सण हो हा साजरा ॥ ३६.१ ॥
हिंदू वर्षामध्ये येई शेवटचा सण होळी
पुरणाची अन् दूध तूप लावूनिया खावी पोळी
रंगपंचमीस चेहेऱ्यांवरती रंगांची रांगोळी
आप्तमित्र ह्यांच्या संगे हा सण होई साजरा ॥ ३६ ॥
यूट्यूब – https://youtu.be/lVMC6IQ_cNM
2 Comments
आपणास साष्टांग दंडवत आपण असेच आम्हास समृद्ध करत राहाल ही अपेक्षा
(अगदी दंडवत नको पण) अशा प्रतिक्रियांमुळे हुरूप येतो. मनःपूर्वक आभार…