वाळवी
सप्टेंबर 15, 2020रडू
ऑक्टोबर 10, 2020सकाळ संध्याकाळ
आज आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिवस आहे. वयोवृद्ध ह्या शब्दाचं सरकारी परिमाण काहीही असू दे, वृद्धपणा हा मानण्यावर असतो. प्रौढत्वी निज शैशवास जपणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्याला सभोवती दिसतात आणि त्याच वेळी अकाली वृद्ध होणाऱ्या व्यक्तीही दिसतात. वय हा केवळ एक आकडा आहे ह्यावर ठाम विश्वास असणाऱ्या व्यक्तींकडून तरुणांनाही बरंच काही शिकता येईल …ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/hzXP-T5AFp4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
अघटीत घडले तेव्हा जेव्हा दुमडून गेला काळ
एकदा सकाळीला भेटाया आली संध्याकाळ ॥
एकसारखे रूप दोघींचे विषय हा विस्मयाचा
तोच वर्ण अन् तीच कांती पण फरक फक्त समयाचा
भेटच नव्हती झाली कधीही होती खरंच कमाल
एकदा सकाळीला भेटाया आली संध्याकाळ ॥
खिन्न मनाने सकाळ करते विचार तेथ बसून
सरला होता उषःकाल अन् चढले होते ऊन
ऊन आणखी चढून येईल मध्यान्हीची हाळ
एकदा सकाळीला भेटाया आली संध्याकाळ ॥
चिंता सकाळीची ऐकून पण संध्याकाळ हसे
आनंदी मी आहे तर मग म्हणशी असे कसे
दुःख नाही मजला गेला जरी तारुण्याचा काळ
एकदा सकाळीला भेटाया आली संध्याकाळ ॥
सोडून गेल्या व्यक्ती होत्या मनामध्ये भावल्या
कलू लागला सूर्यही क्षितिजी लांब होती सावल्या
रात्रच आहे समोर तरीही जगते मी खुशाल
एकदा सकाळीला भेटाया आली संध्याकाळ ॥
आनंदाचे संचित असते मनात प्रत्येकाच्या
काढ आपुले संचित शोधून तू आतून मनाच्या
आयुष्याचे स्वागत करता छोटे दिसे आभाळ
एकदा सकाळीला भेटाया आली संध्याकाळ ॥
शब्द ऐकुनी सकाळ आली लगेच भानावरती
विधिलिखित ते काही असू दे पुढल्या पानावरती
काबूत आले मनही तिचे झाले होते नाठाळ
एकदा सकाळीला भेटाया आली संध्याकाळ ॥
अघटीत घडले तेव्हा जेव्हा दुमडून गेला काळ
एकदा सकाळीला भेटाया आली संध्याकाळ ॥