साबरमतीचा संत
ऑक्टोबर 2, 2018गुपित
फेब्रुवारी 14, 2019शेपटी
बालदिनाच्या मनापासून शुभेच्छा! १४ नोव्हेंबरचा दिवस आला की बालपण आठवतं. तेव्हा FB आणि WhatsAppवर संदेश येत नसले तरी बालविशेषांक घरी येत असत. किशोर, कुमार, चंपक, चांदोबा…. त्यातील गोष्टी, कविता, चित्रं, कोडी… त्या आठवणी ताज्या करणारं हे एक बालकाव्य ‘शेपटी’ माझ्या बालमित्रांसाठी आणि बालपणीच्या मित्रांसाठीही…ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/Kd224iV7Pts ह्या ठिकाणी ऐकता येईल.
गोळा करूनी प्राणी सारे
माकड वनात भाषण ठोके
शस्त्र मानवाचे ते न्यारे
वापरतो तो आपुले डोके
मारूनिया बुद्धीची बढार्इ
पुढे बोलले माकड कपटी
फरक एवढा त्याला नाही
मला मात्र ही असे शेपटी ॥ १ ॥
प्राणी सारे लहान मोठे
ऐकून पडले तेथ विचारी
माणसास घाबरूनी होते
ओळख ज्याची महाशिकारी
माकड बोले काहीबाही
फुगवून आपुली छाती चपटी
फरक एवढा त्याला नाही
मला मात्र ही असे शेपटी ॥ २ ॥
पाहा निरखुनी मजकडे जरा
मानव जणू ऐसा मी दिसतो
सरस असे जरी माझा चेहरा
त्याच्यापरास काकणभर तो
उपटू शके मी हाती पायी
तयाप्रमाणे झाड रोपटी
फरक एवढा त्याला नाही
मला मात्र ही असे शेपटी ॥ ३ ॥
पाहा मला राजा बनवुनिया
वापरेन मी माझी बुद्धी
लावू माणसाला पळवुनिया
वनात येर्इल ह्या समृद्धी
माकड आपुले बोलत राही
प्राणी आपुल्या भीतीस जपती
फरक एवढा त्याला नाही
मला मात्र ही असे शेपटी ॥ ४ ॥
ऐकत सारे बोल कधीचा
बसला होता चतुर तो ससा
विचार करतो बदमाषाचा
डाव उघडकीस आणू मी कसा
भाषण ऐकत हळूच जार्इ
सुसरबार्इ त्या जेथ झोपती
फरक एवढा त्याला नाही
मला मात्र ही असे शेपटी ॥ ५ ॥
होर्इ बंद तो सशास बघता
जबडा मोठा आपोआप
होर्इ आवाज ससा निसटता
बंदुकीचा जणू ओढे चाप
वाक्य अधुरे तोंडी राही
माकड खार्इ अशी आपटी
फरक एवढा त्याला नाही
मला मात्र ही असे शेपटी ॥ ६ ॥
कपटी कपीची पाहून फजिती
प्राणी सारे हसू लागले
अंगावरती धावून जाती
भित्रे माकड पळू लागले
पळतानाही गाणे गार्इ
सावरताना आपुली धोपटी
फरक एवढा त्याला नाही
मला मात्र ही असे शेपटी ॥ ७ ॥
2 Comments
वाह सुंदर विचार मांडले आहेत कवितेत
धन्यवाद रेणू…