अर्थ
ऑक्टोबर 19, 2012बालपणीची मैत्रीण
मे 3, 2013स्वामी विवेकानंद
बारा जानेवारी रोजी नरेंद्र नाथ दत्त अर्थात स्वामी विवेकानंद ह्या महापुरुषाची शतकोत्तर सुवर्णजयंती साजरी झाली. स्वामी विवेकानंदांसारख्या विराट व्यक्तिमत्वाला शब्दांमध्ये बंदिस्त करणे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे. तरीही माझ्या वतीने हा आदरांजलीचा लहानसा प्रयत्न …
क्रियाशील वेदांताचा जो जगास लावी छंद
तो भारतभूचा सुपुत्र होता स्वामी विवेकानंद || धॄ ||
महान गुरूवर असे लाभले आचार्य परमहंस
स्पर्शून गेला युवकाला जणू दिव्यत्वाचा अंश
सुरू जाहला नवीन तेथे गुरूशिष्याचा वंश
चालविण्या तो दिव्य वारसा विशाल ज्याचे स्कंध
तो भारतभूचा सुपुत्र होता स्वामी विवेकानंद || १ ||
वस्तुस्थिती घेण्यास जाणुनी फिरला साऱ्या देशी
प्रगल्भ करण्या विचार लांघे धर्मांच्याही वेशी
पाच वर्ष देशाटन केले चार धाम अन् काशी
पाहुनी द्रवला देशाच्या पिडीत मनीचा आक्रंद
तो भारतभूचा सुपुत्र होता स्वामी विवेकानंद || २ ||
परकीयांच्या राजवटीचे जहर देशात भिनता
भल्याभल्यांनी स्वीकारली होती आपुली स्वाधीनता
दारिद्र्याच्या दरीत कोसळते देशाची जनता
परिस्थितीच्या समोर जो थोपटी आपुले दंड
तो भारतभूचा सुपुत्र होता स्वामी विवेकानंद || ३ ||
पदोपदी दावूनी आपुल्या समाजातल्या त्रुटी
सांगते होते आपुल्याला तुमची कुचकी संस्कृती
न्यूनगंड व्यापून निमाली वाचा आणिक श्रुती
मरगळलेल्या समाजात जो करून उठला बंड
तो भारतभूचा सुपुत्र होता स्वामी विवेकानंद || ४ ||
धर्म आमुचा श्रेष्ठ म्हणत करती परकीय मनमानी
हतबल होऊन बसले होते धर्माचे अभिमानी
प्रचार समजून सत्य येतसे धर्माला मग ग्लानी
फुंकर घालून प्रखर पेटवी वात दिव्याची मंद
तो भारतभूचा सुपुत्र होता स्वामी विवेकानंद || ५ ||
ज्ञान जोखण्या अमेरिकेतील गाठी धर्मपरिषद
साऱ्यांना चढला होता आपुल्या धर्माचा मद
भगिनी आणि बंधू ऐसे शब्द बोले सुखद
म्हणे असावा धर्म जसे निर्झरी पाणी स्वच्छंद
तो भारतभूचा सुपुत्र होता स्वामी विवेकानंद || ६ ||
सोडून सारे मोहजाल देशास परतुनी आला
समाजकार्यासाठी लावला जीव आपुला पणाला
अकालीच झिजूनिया असा पंचत्वी विलीन झाला
भारतीयांची छाती होते आठवणीने रूंद
तो भारतभूचा सुपुत्र होता स्वामी विवेकानंद || ७ ||
क्रियाशील वेदांताचा जो जगास लावी छंद
तो भारतभूचा सुपुत्र होता स्वामी विवेकानंद || धॄ ||