ती
फेब्रुवारी 4, 2011लाडकी
जून 17, 2012सैनिक
बांगलादेशच्या युद्धाला चाळीस वर्षं झाली. भारताच्या दृष्टीने ती ‘मदत’ होती; पाकिस्तानकरता ती ‘घुसखोरी’ होती; तर बांगलादेशकरता तो ‘स्वातंत्र्यलढा’ होता. पण ह्या युद्धाचं चर्वितचर्वण करताना त्यात तिन्ही देशांच्या मिळून मृत्युमुखी पडलेल्या ४०,००० सैनिकांचा विचार कोणी करतंय का?ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/y3_iUpzX8hA ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मनात माजे काहूर तुझिया आठवणींचे लाख
विचार करणे सोड सैनिका पाऊल पुढती टाक || धॄ ||
महान नायक तुला समजतो गाव तुझा तो सारा
हारतुऱ्यांनी निरोप देऊन वळले ते माघारा
विसरून गेले असतील फिरता काळाचे ते चाक
विचार करणे सोड सैनिका पाऊल पुढती टाक || १ ||
तरूण पत्नी तुझ्या विचारी बसली झुरत असेल
अंध आर्इच्या घशामधुनी घासही सरत नसेल
उभे पिक ते कापणीविना झाले असेल खाक
विचार करणे सोड सैनिका पाऊल पुढती टाक || २ ||
तोफांचा भडीमार आणखी गोळ्यांचा वर्षाव
ठाऊक नाही कुठल्या गोळीवरती तुझेच नाव
तुझ्या हातच्या हत्याराचा दावुनी त्यांना धाक
विचार करणे सोड सैनिका पाऊल पुढती टाक || ३ ||
अंधारातून सवंगड्याचा आर्त येर्इ आवाज
बघू नको तू मागे वळुनी सहाय्य करण्या आज
कानावरती पडून देऊ नकोस त्याची हाक
विचार करणे सोड सैनिका पाऊल पुढती टाक || ४ ||
समोरचा तो सैनिक नव्हता कधीच दुष्मन तुझा
पण हुकली गोळी आज तुझी तर मोका नाही दुजा
शौर्याचा मग आव आणुनी भीती मनातील झाक
विचार करणे सोड सैनिका पाऊल पुढती टाक || ५ ||
प्रश्न कोणते लढून सुटले ठाऊक आहे सर्वां
युद्ध तुझे हे नाही ह्माची तुला कशाला पर्वा
समोर जे जे दिसेल ते ते करणे जाळून राख
विचार करणे सोड सैनिका पाऊल पुढती टाक || ६ ||
मनात माजे काहूर तुझिया आठवणींचे लाख
विचार करणे सोड सैनिका पाऊल पुढती टाक || धॄ ||