गुलज़ारजी
ऑगस्ट 19, 2016नसणार तू ….
जून 2, 2018सागरा प्राण तळमळला
भारतमातेची परकीय जोखडातून मुक्तता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून विकास ह्या दोन ध्येयांकरता वाटेल त्या हालअपेष्टा सहन करण्याची तयारी ठेवणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी आहे. ‘न धरी शस्त्र करी मी’ अशा ह्या वीराचा इंग्रजांनी इतका धसका घेतला होता की त्यांना पार अंदमानात पन्नास वर्षांकरता काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. अंदमानातही वीर सावरकर अमानुष अत्याचार सहन करत अथक कार्यरत होते. मात्र मातृभूमीपासून दूर ठेवणाऱ्या सागराला पाहिलं की मनात एकच विचार येत होता….
केवळ सत्तावीस वयाला नशीब फिरवी पाठ
दहा साल पण सुटकेचे सन एकोणीसशे साठ
काळ्या पाण्याकरता सोडी भारतभूचा काठ
दिसेल का कधी भारतमाता आत्मा गहिवरला
एकच विचार मनी सागरा प्राण तळमळला || १ ||
सुसंस्कृतीवर कलंक आणि मानवतेची चेष्टा
खच्चीकरण हो मनाचे कसे सततची पराकाष्ठा
तुरूंगात त्या रात्री सोबत करी मानवी विष्ठा
स्वतंत्रता होमाचा प्रसाद म्हणूनी आलिंगिला
एकच विचार मनी सागरा प्राण तळमळला || २ ||
कोलू ओढून गुराप्रमाणे रक्तबंबाळ मान
दोऱ्या वळता हाती पडतो नसानसांवर ताण
ऐकुनी अभद्र बोल सततचे विषण्ण झाले कान
येतील आपुले दिवस म्हणोनी प्रमाद पत्करला
एकच विचार मनी सागरा प्राण तळमळला || ३ ||
सोबतीस अपराधी मोठे खुनी दरवडेखोर
त्यातच होते खितपत पडले बंधू त्यांचे थोर
साऱ्यांपासून दूर ठेविले एकांतवास घोर
सहस्र कवितांचा संग्रह मग पाठ करूनी रचला
एकच विचार मनी सागरा प्राण तळमळला || ४ ||
स्वस्थ बसावे असा कधी ना आला मनी विचार
परधर्माच्या कांडावरती केला जबर प्रहार
कारागारातही योजीला विद्येचा प्रसार
सर्वसामान्य बंद्यांमध्ये राष्ट्रधर्म पसरवला
एकच विचार मनी सागरा प्राण तळमळला || ५ ||
स्थिती अमानुष अंदमानची ना बदले जोवर
शासनास धाडूनी पत्रके धरले धारेवर
दगडी पाषाणास अखेरीस सुटला मग पाझर
स्वत:स नाही सवलती तरी दुजांसाठी तो झुरला
एकच विचार मनी सागरा प्राण तळमळला || ६ ||
सरकारी नियमांच्या पुढती राहिला ना इलाज
सुटकेनंतर अटींमध्ये दाबला मात्र आवाज
नियम पाळूनी सर्व परंतु सुरू ठेविले काज
प्रतिकुल परिस्थितीला सुद्धा शेवट पुरून उरला
एकच विचार मनी सागरा प्राण तळमळला || ७ ||
स्वतंत्र झाला देश जाहला सत्तेचा पालट
संगे ज्यांच्या दारी आली शक्तीही चालत
द्वेष ठेविला त्यांनीही आपुल्या मनी पाळत
स्वकीयांचेही ताडन झेलत देशासाठी झटला
एकच विचार मनी सागरा प्राण तळमळला || ८ ||
विचार त्यांचे पटतील किंवा वाटतील भ्रामक
भान असावे इतुके लढले देशासाठी अथक
जलधीएवढे कार्य जयाचे व्हावे नतमस्तक
नाही मिळाला मान म्हणोनी जीव हा हुरहुरला
एकच विचार मनी सागरा प्राण तळमळला || ९ ||
2 Comments
” सागरा प्राण तळमळला ” – असं सागराला उद्देशून भावाकुल होऊन म्हणणा-या स्वा. सावरकरांचे अंदमानच्या तुरुंगातील यातनामय जीवन तुमच्या कवितेतून छान शब्द बद्ध झाले आहेत.
स्वातंत्र्यानंतरही त्यांची अवहेलनाच झाली ही खंत…. मनःपूर्वक धन्यवाद!