बालपणीची मैत्रीण
मे 3, 2013गृहिणी
मार्च 7, 2014सचिन
सचिनबद्दल मी तुम्हाला काय सांगावे? सव्वीस वर्षांपूर्वी सुनील गावस्कर निवृत्त झाला (अति प्रेमापोटी सचिन आणि सुनीलचा एकेरी उल्लेख करण्याचं धाडस करत आहे) तेव्हा एवढंच वाईट वाटल्याचं आठवतंय. गेली चोवीस वर्षं आपल्या धकाधकीच्या जगण्यात आनंदाचे असंख्य क्षण दिल्याबद्दल सचिनला धन्यवाद देण्याचा हा छोटासा प्रयत्न . . .
चोवीस वर्षे आपल्या मनांत ज्या व्यक्तीने केलंय घर
नाव आहे त्या व्यक्तीचे सचिन रमेश तेंडुलकर || धृ ||
घोळक्यामध्ये उभा होतो रेडिओ लावून कानाला
स्कोर काय विचारत होता प्रत्येक जण आम्हाला
तीस धावा उरल्या होत्या षटके उरली होती तीन
तरीही सारे आशावादी खेळत होता अजून सचिन
पोकळी भरली त्याने जेव्हा पर्व संपले गावस्कर
नाव आहे त्या व्यक्तीचे सचिन रमेश तेंडुलकर || १ ||
ओझे वाहतो अपेक्षांचे शंभर कोटी जनतेचे
भल्याभल्यांना कळले नाही गुपित त्याच्या क्षमतेचे
मुंबर्इ दिल्ली चेन्नर्इ कोलकाता पुणे असो किंवा कोचिन
खेडोपाडी गावोगावी म्हणती तव ‘अपना सचिन’
चैतन्याचे वारे फुंकू शकतो सार्या देशभर
नाव आहे त्या व्यक्तीचे सचिन रमेश तेंडुलकर || २ ||
कितीक आले कितीक गेले केली ज्यांच्याशी तुलना
काळाच्या ओघात निमाले तुझ्या विक्रमांना खळ ना
कसे करावे बाद पडे मग सार्यांना हा प्रश्न कठीण
गोलंदाजांच्या दु:स्वप्नांमध्ये तळपे अजून सचिन
सुवर्णाक्षरी नवे पराक्रम इतिहासाच्या पानांवर
नाव आहे त्या व्यक्तीचे सचिन रमेश तेंडुलकर || ३ ||
समालोचकांमध्ये स्पर्धा लागे करण्या अति स्तुती
पत्रकारही अदम्य करती विशेषणांच्या बरसाती
समजत नाही आता त्याला संबोधावे काय नवीन
शतक ठोकतो नवोदित तर म्हणती त्याला प्रतिसचिन
ब्रॅडमनच्या स्तुतिसुमनांनी चढविले जयासी कळसावर
नाव आहे त्या व्यक्तीचे सचिन रमेश तेंडुलकर || ४ ||
नशीब आमुचे थोर असे जे ह्मा डोळा पाहिले तुला
अशक्य आहे भविष्यकाळी होणे ऐसा दुजा जुळा
आनंदाचे आंदण देणे शक्तीच आहे तुझ्या अधीन
प्रतिस्पध्र्यांना देऊ शकसी तोष फक्त बघ तूच सचिन
शतक ठोकतो जेव्हा तेव्हा देशच थांबे जणू पळभर
नाव आहे त्या व्यक्तीचे सचिन रमेश तेंडुलकर || ५ ||
विक्रम अळवावरचे पाणी मोडीत निघती नित्यनवे
अनंतकाळी अभेद्य टिकतील विचार हे असती फसवे
गर्वाचे घर वर ना येते आदर मिळतो राहूनी लीन
कीर्ती पचवुनी शांत रहावे उदाहरण ते दावी सचिन
धावांपेक्षा रचले ज्याने हर्षोल्हासाचे डोंगर
नाव आहे त्या व्यक्तीचे सचिन रमेश तेंडुलकर || ६ ||
चोवीस वर्षे आपल्या मनात ज्या व्यक्तीने केलंय घर
नाव आहे त्या व्यक्तीचे सचिन रमेश तेंडुलकर || धृ ||