सैनिक
डिसेंबर 15, 2011मित्र एक चांगला
ऑगस्ट 3, 2012लाडकी
जून १७ (जून महिन्यातील तिसरा रविवार) हा दिवस आंतरराष्ट्रीय पितृदिन म्हणून साजरा होणार आहे. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पित्याने आपल्या अपत्याविषयी भावना व्यक्त करणं म्हणजे आपला कमकुवतपणा दाखवून देणं असा काहीसा समज रूढ होता. पुरुषप्रधान संस्कृतीप्रमाणेच हा समजही आता मागे पडत चालला आहे. एका पित्याच्या आपल्या अपत्याविषयी – विशेषतः कन्येविषयी – भावना किती हळव्या असू शकतात हे दाखवण्याचा हा प्रयत्न.
जिना उतरताना गच्च धरायचो तुझा हात
तुझा इवलासा पंजा पार लपून जायचा माझ्या हाताच्या आत
मग उड्या मारत उतरायचीस तू भीती न वाटता अजिबात
अगदी आत्ता आत्तापर्यंत || १ ||
माझ्या खांद्यावर बसण्याचा तुला लागला होता छंद
अलगद उचलून घ्यायचो धरून तुझे दोन्ही दंड
खांद्यावर बसल्यावर मात्र भीतीने तुझी चुळबुळ व्हायची बंद
अगदी आत्ता आत्तापर्यंत || २ ||
शाळेत जाताना तुझं हमसून हमसून रडणं
खेळताना नेहमीचंच पडणं धडपडणं
आठवतंय तुझं राग गेला की गालात खुदकन हसणं
अगदी आत्ता आत्तापर्यंत || ३ ||
गणितात शत्रू नंबर एक म्हणजे भागाकार
मराठीवर कधी कधी इतके केलेस अत्याचार
पाठांतर म्हंटलं की सुरू व्हायची तुझी तक्रार
अगदी आत्ता आत्तापर्यंत || ४ ||
संध्याकाळी जेवताना बडबडायचीस दिवसभराच्या गोष्टी
कधी आनंदी असायचीस तर कधी असायचीस कष्टी
गोष्टी संपायच्या नाहीत ताटं तशीच राहायची उष्टी
अगदी आत्ता आत्तापर्यंत || ५ ||
गळ्याला मिठी मारायचीस पलंगावर उभी राहून
पाठीवर चढून बसायचीस साखरेचं पोतं बनून
कधीही पडशील अशी भीती वाटायची तुला दुडूदुडू धावताना बघून
अगदी आत्ता आत्तापर्यंत || ६ ||
आता मोठी मोठी पुुस्तकं वाचतेस झर्रकन
शाळेतल्या गहन प्रश्नांची उत्तरं देतेस पटकन
अगं चिऊकाऊच्या गोष्टी ऐकून हसत होतीस खुदकन
अगदी आत्ता आत्तापर्यंत || ७ ||
कधी झालीस मोठी आता खांद्याला लागतेस
मोठ्यांसारखं बोलतेस आणि तसंच वागतेस
म्हणायचो तुला मी किती पोरकटपणा करतेस
अगदी आत्ता आत्तापर्यंत || ८ ||
अशीच मोठी होत जाशील आमच्या लक्षात येर्इस्तोवर
घरट्यातून पक्षी उडून जातात तशी दूर जाशील खरोखर
तेव्हा आम्ही म्हणू होय, आमची लाडकी राहात होती आमच्या बरोबर
अगदी आत्ता आत्तापर्यंत || ९ ||