स्वामी विवेकानंद
जानेवारी 18, 2013सचिन
नोव्हेंबर 25, 2013बालपणीची मैत्रीण
फेसबुक आणि इंटरनेट सोडा, साधे फोनही दुर्मिळ असलेल्या आपल्या बालपणीच्या काळात मित्र किंवा मैत्रीण हरवून जाणं हे काही अपवादात्मक नव्हतं. तुमचे आहेत का हो असे मित्र किंवा मैत्रीण जे आजही आठवण आली की मनाला हुरहूर लावून जातात?
तुझा नी माझा मेळ
बालपणीचा खेळ
साखर ते पक्वान्न
कुरमुर्याची अन् भेळ || १ ||
डोळे ते काजळी
गालावरती खळी
हसू तुझे ते ऐसे
जशी उमलते कळी || २ ||
शाळेत असता जात
घालून हाती हात
धाडून देती घरचे
त्या इवल्याशा जगात || ३ ||
रोज रोज भांडणे
चावणे बोचकारणे
वेळ जाताच थोडा
गळ्यात गळे घालणे || ४ ||
सायकल तीन चाकी
बिल्डिंगमागची टाकी
कधी थाटू संसार
कधी बांधलीस राखी || ५ ||
समय थांबला कोठे
थोडे झालो मोठे
मुलीसवे खेळतो
मित्रच चिडवत होते || ६ ||
शाबित करण्या जार्इ
माझी मैत्रीण नाही
तुजला मी दुखविले
बोलून काही बाही || ७ ||
तुला न समजे डाव
बसे जिव्हारी घाव
दिसत तुझ्या नयनांत
होते दुखरे भाव || ८ ||
पालटले मग चित्र
जोडत गेलो मित्र
मिळवित अन् मैत्रीणी
रमलीस तू अन्यत्र || ९ ||
आठवत नाही आता
आयुष्य सरकत जाता
कशा आणखी कोठे
भिन्न जाहल्या वाटा || १० ||
वाढे जगविस्तार
असंख्य मनी विचार
नवलार्इच्या डोही
हरवून गेलीस पार || ११ ||
मनी येर्इ आवाज
आठवण आली आज
वर्षांनंतर इतुक्या
मलाच वाटे लाज || १२ ||
शोधू कसा हा पेच
नावही नसेल तेच
मार्गच नाही कुठला
मनास लागे ठेच || १३ ||
कशी दिसत असशील
कुठे वसत असशील
कशा मित्रपरिवारी
कुठे रमत असशील || १४ ||
ताबा नाही मनावर
इच्छा होर्इ अनावर
शक्य नाही भेटणे
उपाय नाही ह्मावर || १५ ||
पण मग विचार सुचला
नकोच भेटूस मजला
ठेवा जपेन मी जो
मनात माझ्या रूजला || १६ ||
कधी स्मॄती वेचीन
मलाच मी सांगीन
होती माझी एक
बालपणी मैत्रीण || १७ ||