सैनिक
डिसेंबर 15, 2011ती
एखादी व्यक्ती दुःखी आहे ह्या कल्पनेवर आपला फार पटकन विश्वास बसतो. मग ती व्यक्ती आपल्या जवळच्या नात्यातील असो नाहीतर केवळ कधीतरी ओझरती पाहिलेली असो. अर्थातच ह्या कल्पनेत नेहेमी तथ्य असतंच असं नव्हे …
मी रस्त्यावरती
अन् खिडकीमध्ये ती
दिसली ओझरती
पण मनी अल्हाद झाला || १ ||
मोकळे होते केश
साधा घरचा वेष
ठाऊक नाही शेष
पण चेहरा आपला वाटला || २ ||
केसामध्ये फुल
किंचित होती स्थूल
कमरेवरती मुल
खेळवत होती त्याला || ३ ||
आनंदाची भरती
सुंदर चेहेऱ्यावरती
सुखाचीच ती मुर्ती
हास्य जणु मधुबाला || ४ ||
रोजचा बसचा रस्ता
खिडकीशी मी बसता
तेथे आलो असता
रोज दिसे ती मजला || ५ ||
ओळख माझी नाही
तशी शक्यता नाही
तरीही जेव्हा पाही
बरं वाटे मनाला || ६ ||
बाकी दिवसभर
कामाचा डोंगर
पण दिसे जेव्हा घर
वाटे हवी दिसायला || ७ ||
एकदा दिसली ती
शेजारी पती
आडदांड जणू यती
जसा कातळ काळा || ८ ||
तिचा चेहरा खास
होता का उदास
आला नाही रास
वार्इट वाटे मजला || ९ ||
पतीच असेल तर
होता वयस्कर
ती एवढी सुंदर
कसा मिळाला तिला || १० ||
दिवसभर विचार
केला मग मी फार
तिच्या नशिबी भार
आला असा कशाला || ११ ||
दुसऱ्या दिशी परत
जेव्हा होतो बघत
होती सुंदर हसत
आपल्याशीच ती बाला || १२ ||
दिसत होती सुखी
नव्हती कधी जणू दु:खी
अनोळखी ती सखी
हर्ष परतून आला || १३ ||
ताबा ना मनावर
राग असे जगावर
दुसऱ्याच्या दु:खावर
विश्वास बसतो आपला || १४ ||
कालचक्र ते सरते
अंधुक आठवण उरते
आजही पण ती स्मरते
हर्ष देते मनाला || १५ ||
अजून आहे आठवण
देऊन गेली शिकवण
आनंदाची साठवण
नियम नाहीत त्याला || १६ ||