
सचिन
नोव्हेंबर 25, 2013
एक भाऊ असावा
ऑक्टोबर 17, 2014गृहिणी

आपल्यापैकी किती पुरुष नोकरी सोडून घर सांभाळू शकतील? हसण्यावारी नेऊ नका, नुसत्या विचारानेही घाम फुटेल. अनेक कमावते पुरुष घरची आघाडी भक्कम ठेवणाऱ्या गृहिणीला सोयीस्करपणे कमी लेखतात. आठ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन’ संपन्न होत आहे. त्यानिमित्त ह्या ‘गृहिणी’चं केलेलं हे थोडंसं कौतुक . . .
घरामध्ये ती तेवत असते जसा असावा दिवा
नसतानाही जाणवते ती जशी सुगंधी हवा
घरातील त्या सौख्य पीतसे तिच्याच हातून पाणी
राहती जागा घर बनविते घरामधील गृहिणी || १ ||
मुलांसवे ती दिवस दिवसभर अभ्यास असे गिरवत
सुट्टीमधले छंदवर्गही तीच अन् असे ठरवत
वागण्यामधील फरक मुलांच्या समजे तिजला झणी
राहती जागा घर बनविते घरामधील गृहिणी || २ ||
तीच ठरविते किती आणावे महिन्याचे सामान
कुठून मिळती स्वस्त वस्तू ही असते तिजला जाण
अन्नपूर्णाच जशी राहते आपुल्या छोट्या सदनी
राहती जागा घर बनविते घरामधील गृहिणी || ३ ||
आजाराची कोणावरही आली जर का वेळ
सेवेसाठी तत्पर जणू ती फ्लोरेन्स नाइटिंगेल
पथ्य पाळण्यासाठी दक्षता घेते ती अनुदिनी
राहती जागा घर बनविते घरामधील गृहिणी || ४ ||
लाजवेल जी वित्तमंत्य्रास सक्षम अर्थव्यवस्था
बचत करे ती बाजारातील किमती वाढत असता
प्रसंग येता बाका देते पैसे तव आणुनी
राहती जागा घर बनविते घरामधील गृहिणी || ५ ||
बाहेरचे अन् घरचे सारे काम पाडिते पार
सुट्टी नाही त्या कामाला ना सण ना रविवार
स्वागत करते आगंतुकांचे तरी प्रसन्न हसूनी
राहती जागा घर बनविते घरामधील गृहिणी || ६ ||
पदोन्नतीची आशा नाही पदक नाही ना चषक
गृहितच धरती सारे तिजला राबे तरीही अथक
कौतुक सारे तिचे करूया निदान ह्मा स्त्रीदिनी
राहती जागा घर बनविते घरामधील गृहिणी || ७ ||