गृहिणी
मार्च 7, 2014संशयी ससा
एप्रिल 17, 2015एक भाऊ असावा
राखीपौर्णिमेला जाहिरातबाजी कितीही झाली तरी महाराष्ट्रात भाऊ-बहीण नात्याला खरा उजाळा मिळतो तो भाऊबिजेला! प्रत्येक मुलीला, स्त्रीला आपल्याला आधार देणारा एक भाऊ असावा असं नक्की वाटतं. पुढल्या आठवड्यात येणाऱ्या भाऊबिजेच्या निमित्ताने एका बहिणीच्या भावना अधोरेखित करणारी ही कविता . . .
आपलं सुख आपलं मानून
घेणारा एक भाऊ असावा
आपल्या दु:खात ठाम उभा
राहणारा एक भाऊ असावा || धृ ||
लहानपणीच्या तंट्यांमध्ये
हातघार्इवर वेळ आली
तर त्या दांडग्यांना पिटाळून
लावणारा एक भाऊ असावा || १ ||
शाळेत शिक्षा झाली म्हणून
ओरडावं त्याने आपल्याला
पण वडिलांच्या समोर पाठीशी
घालणारा एक भाऊ असावा || २ ||
अभिमानाने वागत असता
आपल्याकरता परक्या घरी
नम्रपणाने स्थळ घेऊन
जाणारा एक भाऊ असावा || ३ ||
सतत खोड्या काढल्या तरी
पाठवणीची वेळ येताच
कोपर्यात लपून आपले डोळे
पुसणारा एक भाऊ असावा || ४ ||
अरेतुरेची सलगी सार्या
मोठ्यांकरता चालत नाही
मुलांकडून मामा म्हणवून
घेणारा एक भाऊ असावा || ५ ||
आर्इ वडील कधी कुणाच्या
आयुष्याला पुरले आहेत
वडिलकीने तेव्हा आधार
देणारा एक भाऊ असावा || ६ ||
संकटं तर येतच असतात
त्यातून कोण सुटलं आहे
खंबीर राहून तेव्हा धीर
देणारा एक भाऊ असावा || ७ ||
आपलं सुख आपलं मानून
घेणारा एक भाऊ असावा
आपल्या दु:खात ठाम उभा
राहणारा एक भाऊ असावा || धृ ||