केस
ऑक्टोबर 30, 2020अनादी अनंत लढा
नोव्हेंबर 18, 2020विसात नव्वद शोधू नको
‘हल्लीच्या मुलांना काही ताळतंत्र राहिलेलं नाही’ किंवा ‘आमच्या वेळेला हे असलं वागणं मुळीच खपवून घेतलं जात नसे’ ही विधानं अनादी काळापासून आजतागायत केली जात आहेत. जुनी पिढी नव्या पिढीला लहानाचं मोठं होताना बघते जे त्यांना स्वीकारता येत नाही आणि नव्या पिढीला जुनी पिढी अडगळ वाटू लागते. कालचक्राची अपरिहार्यता लक्षात आली की जुनी पिढी नव्या काळात आपला जुना काळ शोधू लागते …ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/qVDHSn-KCr4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
कालचक्र हे फिरतच राही दुःख वृथा तू करू नको
विसात नव्वद शोधू नको ॥ धृ ॥
जुनी जाहली तुझी पिढी अन् नवी पिढी हे सरसावे
तुझ्या पिढीच्या स्वप्नांमागे नवी पिढी ती बघ धावे
काळाची ही नदी वाहती उगाच तिजला अडवू नको
विसात नव्वद शोधू नको ॥ १ ॥
थेटरातले जाती सिनेमे बघती सारे फोनवरी
क्रिकेटमधली षटके आली पन्नासाहून वीसवरी
कोहली बुमराच्या ह्या काळी सचिन कुंबळे आठवू नको
विसात नव्वद शोधू नको ॥ २ ॥
हॉटेलाचे जेवण होते कधीकाळची चैन खरी
इंटरनेट आता दिमतीला हॉटेलच ते येई घरी
नवीन पिढीचे आरोग्य घटते उगाच गमजा करू नको
विसात नव्वद शोधू नको ॥ ३ ॥
गाळावा लागत होता तुज मित्राला भेटण्यास घाम
काय बिघडले मैत्रीकरता वापरले जर इन्स्टाग्राम
करुनी ओरडा साप साप तू आता भुई धोपटू नको
विसात नव्वद शोधू नको ॥ ४ ॥
तंत्रज्ञानाची ही भरारी उंच जातसे वेगाने
संगणकाचे अप्रूप तुजला फोन आता पुरतो जाणे
डायलवाल्या कृष्णफोनच्या आठवणींनी झुरू नको
विसात नव्वद शोधू नको ॥ ५ ॥
पिकले केस लागला चश्मा निवृत्ती दिसते पुढती
जबाबदाऱ्या कमी जाहल्या कामे ना तुजवीण अडती
छंद जोपास कामावरती उशिरापर्यंत थांबू नको
विसात नव्वद शोधू नको ॥ ६ ॥
नव्वदात होते थोडे ते ऐंशी सत्तर साठही रे
नवीन सहस्रक असे निराळे बांधून घे तू गाठ ही रे
सज्ज उड्डाण करण्याकरता नवी पिढी थांबवू नको
विसात नव्वद शोधू नको ॥ ७ ॥
कालचक्र हे फिरतच राही दुःख वृथा तू करू नको
विसात नव्वद शोधू नको ॥ धृ ॥