थोडं आणखीन ..
डिसेंबर 19, 2021भारत रत्न मालिका
जानेवारी 18, 2022विद्ध
सीताहरणाकरता स्वतःला जबाबदार ठरवून पश्चात्तापाच्या आगीत होरपळणाऱ्या लक्ष्मणाने प्रभू श्रीरामांकडे दयेची याचना केली. सीतेच्या विरहामुळे व्याकूळ झालेल्या श्रीरामांना लक्ष्मणाची त्यांच्याप्रती समर्पण भावना पुन्हा एकदा जाणवली. मात्र त्याहीपुढे जाऊन त्या हळव्या क्षणी इतके दिवस स्वतःचं दुःख बाजूला सारून लक्ष्मणाने दाखवलेली निष्ठा त्यांना समजून आली ..माझी ‘विद्ध’ ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/LduVdOTIlxI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
चंदनापरी शीतल मनही दग्ध जाहले
बंधुराज आज असे विरही विद्ध जाहले ॥ धृ ॥
निक्षूनी वदले बंधू सीतेचे कर रक्षण
तरीही ताडता माता सोडिलेच सदन हे
कपटी मारिचाकारण मातेचे होई हरण
ऐसा घडला प्रमाद लपवू कुठे वदन हे
पश्चात्तापात जळत हृदय क्षुब्ध जाहले
बंधुराज आज असे विरही विद्ध जाहले ॥ १ ॥
राम तथा जानकीस दो शरीरे असती जरी
अस्तित्त्वच दोघांचे एकरूप एकसंध
कोसळला वृक्ष जणू वादळात भूवरी
देण्या आधार मात्र असे हा थिटा स्कंध
काय वदू शब्दच हे कंठी रुद्ध जाहले
बंधुराज आज असे विरही विद्ध जाहले ॥ २ ॥
गिळून लाज वदलो चरणासी होऊनी लीन
शोधीन मातेस असे स्वर्ग भूमी पाताळी
दुःख हरुनी तुमचे मी होईन मग स्वाधीन
येऊनी घेईन दंड लिहिला जो ह्या भाळी
ऐकुनी ते अश्रूंनी नयन स्निग्ध जाहले
बंधुराज आज असे विरही विद्ध जाहले ॥ ३ ॥
प्रारब्धी जे असते टळले ते वद कुणास
उठवूनी मजला बंधू मृदूवचनी बोलले
तुझे दुःख आज समजुनी आले मन्मनास
ऐकताच बोल तेथ मन माझे डोलले
समजविण्याला मज श्रीराम सिद्ध जाहले
बंधुराज आज असे विरही विद्ध जाहले ॥ ४ ॥
भार्येचा विरह आज सहन मला होईना
वनवासी निजदिनी तू तेच दुःख सोसले
आत्ममग्न विस्मरलो दुःख तुझे नाही ना
जाणवता व्यथा तुझी मन हे ओशाळले
ऐकुनी ते वचन मनी सुरु युद्ध जाहले
बंधुराज आज असे विरही विद्ध जाहले ॥ ५ ॥
उसने अवसान नयनी दे निरोप उर्मिला
भार्येची मूर्ती चक्षुपुढती उभी राहिली
इतुके दिन थोपविले संगतीच्या ऊर्मिला
नयनांवाटे ती क्षति भळभळून वाहिली
प्रीत तिची आठवूनी हृदय शुद्ध जाहले
बंधुराज आज असे विरही विद्ध जाहले ॥ ६ ॥
चंदनापरी शीतल मनही दग्ध जाहले
बंधुराज आज असे विरही विद्ध जाहले ॥ धृ ॥