नगण्य
फेब्रुवारी 4, 2011थोडा धीर धर
जुलै 1, 2011शून्य
मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये भारताचं योगदान ‘शून्य’ आहे! कारण मानवी इतिहासातील सर्वात जास्त क्रांतिकारी मानल्या जाणाऱ्या शोधांपैकी एक अशा शून्याचा शोध भारतात लावला गेला. संपूर्ण विज्ञान ह्या एका शून्यावर आधारित आहे. आणि क्लिष्ट होत जाणारं विज्ञान जसजसं तत्वज्ञानाच्या जवळ जात आहे तसतसं तत्वज्ञानातीलही शून्याचं महत्व अधिकाधिक जाणवू लागलं आहे.ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/mC5SjpZlGq0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
गणितामध्ये शून्याला फार मोठा मान
सर्वात मोठ्या शोधांमध्ये त्याला मोठं स्थान
कितीही मोठ्या संख्या असोत शून्य देतं साथ
सूक्ष्म संख्या झाल्या असत्या शून्याविना अनाथ
विज्ञानाच्या समीकरणांना साधन नव्हतं अन्य
अनंत मोठ्या ब्रह्मांडाचं उत्तर आहे शून्य || १ ||
फार वर्षांपूर्वी झाला शून्याचा विस्फोट
आजचं विश्व तयार झालं मोठं होत होत
भविष्य ब्रह्मांडाचं काय ह्माचे कयास अनेक
वैज्ञानिक म्हणती उत्तर शून्यच पण बहुतेक
शून्याच्या ह्मा कोड्यामध्ये गुंतले शास्त्रज्ञ
अनंत मोठ्या ब्रह्मांडाचं उत्तर आहे शून्य || २ ||
माझ्या अस्तित्वाची साक्ष देतं माझं तन
ब्रह्मांडाला समजून घेण्या लागे मजला मन
जन्माआधी शून्यच होतं माझं हे अस्तित्व
तना मनाचं शून्य मॄत्यूनंतर ते महत्व
शून्यच माझा आदि आणि अंतही आहे शून्य
अनंत मोठ्या ब्रह्मांडाचं उत्तर आहे शून्य || ३ ||
आपल्याला एखादी भौतिक वस्तू जेव्हा दिसते
संदर्भाला आजुबाजूस दुसरे काही असते
परमेश्वर जर ब्रह्मांडाच्या चराचरातून वसतो
दिसेल कसा तो कोणालाही संदर्भच जर नसतो
शून्यत्वाचं रूप र्इश्वरी झालं म्हणूनच मान्य
अनंत मोठ्या ब्रह्मांडाचं उत्तर आहे शून्य || ४ ||
शून्य फक्त दाखवत नाही पदार्थाचं नसणं
शून्य ठिकाणी संपून जातं असणं किंवा नसणं
शून्यावरती आधारलेलं आहे सारं विज्ञान
शून्यालाच पायाभूत मानतं तत्वज्ञान
ज्या व्यक्तीने शोधलं शून्य आहे खरंच धन्य
अनंत मोठ्या ब्रह्मांडाचं उत्तर आहे शून्य || ५ ||