किती सूक्ष्म किती भव्य
सप्टेंबर 19, 2014जीवन एक अपघात
नोव्हेंबर 18, 2016काळजी घे
माणूस समूहात राहणारा प्राणी असल्यामुळे बरेचदा त्याच्याकरता मुंग्या, पक्षी, मासे अशा समूहात राहणाऱ्या प्राण्यांची उपमा वापरली जाते. मात्र माणूस हा ह्या इतर प्राण्यांपेक्षा सर्वस्वी भिन्न प्राणी आहे. प्रत्येक माणसाला स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव असते. त्यामुळे माणसाकरता आपल्या समूहाच्या संरक्षणाएवढंच स्वतःचं वैयक्तिक संरक्षणही महत्वाचं असतं.
तू आहेस तोवर ब्रह्मांड आहे
तुझं एकच आयुष्य आहे
काळजी घे || धृ ||
लक्षावधी माणसं जातात गाडीचे रूळ ओलांडून
शेकडो माणसं गाडीखाली जातात छिन्नविच्छिन्न सांडून
पुलावरून जाणं ही खास तुझ्याकरता केलेली सोय आहे
तुझं एकच आयुष्य आहे
काळजी घे || १ ||
लक्षावधी माणसं व्यसनाधीन होतात
शेकडो माणसं व्यसनांमुळे मरतात
क्षणिक तलफ पण किंमत फार जास्त आहे
तुझं एकच आयुष्य आहे
काळजी घे || २ ||
लक्षावधी माणसं गाड्या चालवतात बेदरकार
शेकडो माणसांवर पडते अपघाताची कुठार
वाचणार्या मिनिटांकरता गमावलेल्या वर्षांचं मोल फार मोठं आहे
तुझं एकच आयुष्य आहे
काळजी घे || ३ ||
लक्षावधी माणसं आरोग्याची करतात हेळसांड
शेकडो माणसं अल्पायुषी ठरतात जरी दिसली आडदांड
लवकर उठायचा कंटाळा हे कारण अनाठायी आहे
तुझं एकच आयुष्य आहे
काळजी घे || ४ ||
लक्षावधी माणसं पैसा कमावतात जीव तोडून
शेकडो माणसं जातात पैसा अर्ध्यातच सोडून
पैशाचं मोल काय हे तुलाच ठरवायचं आहे
तुझं एकच आयुष्य आहे
काळजी घे || ५ ||
तू वनातील झाड नाहीस
तू तळ्यातील मासा नाहीस
तू वारूळातील मुंगी नाहीस
तू कळपातील हरीण नाहीस
तू थव्यातील पक्षी नाहीस
तुझं स्वत:चं व्यक्तिमत्व आहे
तुझं स्वत:चं अस्तित्व आहे
तुझ्यात विचार करण्याची क्षमता आहे
तुझ्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे
पॄथ्वीवरील जीवसॄष्टी पुढे नेणं हे तुझं लक्ष्य नव्हे
तुझं जगणं केवळ भक्षक किंवा केवळ भक्ष्य नव्हे
लक्षावधी माणसं आहेत पॄथ्वीतलावर जगणारी
शेकडो माणसं मरतात बनून केवळ आकडेवारी
तुझ्या मरणाचं कुणाला सोयरसुतक नसणार आहे
तू आहेस तोवर ब्रह्मांड आहे
तुझं एकच आयुष्य आहे
काळजी घे || ६ ||