logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
नगण्य
फेब्रुवारी 4, 2011
अंकायन
फेब्रुवारी 4, 2011
अंक किंवा आकडे म्हटलं की आपल्याला गणित आठवतं आणि गणित म्हटलं की बऱ्याच जणांना उगीचच धास्तावाल्यासारखं वाटायला लागतं. पण अंक म्हणजे केवळ गणिताचा विषय नव्हे. आयुष्यात आपल्याला सभोवती जागोजागी अंक दिसून येतील. अशाच आपल्या आयुष्यात येणाऱ्या दहा मूळ अंकाचं हे ‘अंकायन’!

सान थोर नर नारी आणि राव असो वा रंक
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || धृ ||

पहिला वहिला अंक येतो
म्हणती त्याला एक
महत्व ह्याचे भारी तरीही
वृत्ती आहे नेक || १.१ ||

गुणा अथवा भागा ह्याने
फरक नाही पडत
तीच संख्या तुमच्या समोर
तशीच येर्इल परत || १.२ ||

करा ह्याचा वर्ग किंवा
काढा वर्गमूळ
सोडत नाही कधीच हा
आपली जातकूळ || १.३ ||

आपल्या आयुष्यात ह्याला
महत्व आहे फार
पहिलं येण्यासाठी जो तो
कष्ट करी अपार || १.४ ||

भिन्न भाषा भिन्न प्रांत
देश तो एकमेव
भिन्न वर्ण अन् भिन्न धर्म
एकच तरीही देव || १.५ ||

आयुष्याच्या नाटकालाही एकच असतो अंक
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || १ ||

सान थोर नर नारी आणि राव असो वा रंक
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || धृ ||

पहिली मूळ संख्या म्हणूनी
अंक येतो दोन
अनेकवचनी ह्याच्यापेक्षा
लहान आहे कोण || २.१ ||

सम संख्यामालेतील आहे
हे तर शेंडेफळ
संगणकाच्या भाषांमध्ये
पाया हाच अढळ || २.२ ||

नर नारी अन् वार्इट चांगलंं
कॄष्ण असो वा श्वेत
ब्रह्मांडाच्या प्रत्येक बाबीत
दाखवतो हा द्वैत || २.३ ||

आवाजाची दिशा समजण्या
असती दोन कान
दोन डोळे पाहून देती
अंतराची जाण || २.४ ||

दोन हाती काम करण्या
नेती दोन पाय
त्यांच्याशिवाय उदरनिर्वाह
चालेल आपला काय || २.५ ||

उंच भरारी गगनी घेण्या असती दोन पंख
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || २ ||

सान थोर नर नारी आणि राव असो वा रंक
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || धृ ||

पहिली मूळ विषम संख्या
आहे ही तर तीन
गुणवत्तेची ह्याच्याखाली
पत नसे आणखीन || ३.१ ||

तीन जर का बेरीज झाली
साऱ्या अंकांची
नि:शेष वाटणी संख्येची
त्या तीन भागांची || ३.२ ||

ब्रह्मांडाचे तीन लोक
स्वर्ग धरा पाताळ
ब्रह्मा विष्णु महेश तिघेजण
करती देखभाल || ३.३ ||

तेरड्याचा तो रंग राहतो
फक्त तीन दिवस
तीन पानं असतील तरच
ओळखू येई पळस || ३.४ ||

हॅटट्रिक सलग तीन गडी जर
बाद केले तर
देवही देतो तपानंतर
मोजून तीनच वर || ३.५ ||

परक्या आक्रमकांना तिन्ही सेना देती डंख
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || ३ ||

सान थोर नर नारी आणि राव असो वा रंक
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || धृ ||

दोनाचा जर वर्ग केला
तर मग येतो चार
पदार्थांना स्थैर्य देण्यास
उपयोग ह्याचा फार || ४.१ ||

अंतिम दोन अंकांना जर
चार भागेल नि:शेष
तर पूर्ण संख्येमध्येसुद्धा
रहाणार नाही शेष || ४.२ ||

चार चाकं चार पाय
स्थैर्य ते देती
विज्ञानात चौथी आहे
समयाची मिती || ४.३ ||

चार आश्रमी जीवन जावे
सांगती चार वेद
वापर चार उपाय साम
दाम दंड भेद || ४.४ ||

पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण
मुख्य चार दिशा
चौकामध्ये मिळून येती
वाटा चार अशा || ४.५ ||

क्रिकेटमध्ये चौका मारून धावू नये नि:शंक
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || ४ ||

सान थोर नर नारी आणि राव असो वा रंक
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || धृ ||

अंकावलीत मध्यभागी
येतो अंक पाच
सर्व अंकांमध्ये सर्वात
सोपा अंक हाच || ५.१ ||

संख्येमध्ये शेवटी आले
पाच किंवा शून्य
पाचाने मग भाग जातो
गणित सर्वां मान्य || ५.२ ||

पाच असतात बोटं जरी
सारखी नसली तरी
पाच पांडव शंभर कौरवांना
पडले भारी || ५.३ ||

पंचमहाभूतं सारी
सृष्टी चालवत आली
पंचज्ञानेंद्रियांनी ही
जाणीव आपणा दिली || ५.४ ||

मंत्र्यांनाही साऱ्या सुविधा
पंचतारांकित
पंचवार्षिक योजना ते
बसतात मग बनवीत || ५.५ ||

पंचांमृताशिवाय पूजेत वाजत नाही शंख
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || ५ ||

सान थोर नर नारी आणि राव असो वा रंक
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || धृ ||

एक दोन आणि तीनची बेरीज
अंक येतो सहा
एक दोन तीनचा गुणाकारही
हाच येतो पहा || ६.१ ||

सम संख्या जर पूर्ण भागली
जाते तीनाने
तर ती संख्या भागली जाते
निश्चित सहाने || ६.२ ||

हेमंत शिशिर वसंत ग्रिष्म
वर्षा आणि शरद
वर्षभराचे गाणे म्हणजे
सहा ऋतूंचे पद || ६.३ ||

काम लोभ क्रोध मद
मोह आणि मत्सर
सहा शत्रू ते मानवाचे
मनात करती घर || ६.४ ||

सीमेपार चेंडू जाता
देर्इ सहा धावा
सहामाही परीक्षेकरता
देवाचाच धावा || ६.५ ||

सहावी जाणीव जेव्हा येते मनास करते थक्क
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || ६ ||

सान थोर नर नारी आणि राव असो वा रंक
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || धृ ||

सर्वात मोठा मूळ अंक तो
म्हणून येतो सात
पाढा ह्याचा आला नाही
करील तुमचा घात || ७.१ ||

सप्तपदीची सात पाऊले
सहचर ठरवून देती
सप्ताहाचे सात दिवस ते
अव्याहत बघ येती || ७.२ ||

सात सुरांच्या सजावटीने
मंत्रमुग्ध मनुष्य
सात रंग ते सजवून जाती
नभीचे इंद्रधनुष्य || ७.३ ||

सात आश्चर्यं जगात असती
भव्य दिव्य अपार
दिसतील तुम्हा जाऊन तेथे
सात समुद्रापार || ७.४ ||

सप्तर्षींनी भारतवर्ष
केले समॄद्ध
सात बुटके सेवेसी
हिमगौरी बेशुद्ध || ७.५ ||

सात वीर दौडले होता शिवबा साशंक
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || ७ ||

सान थोर नर नारी आणि राव असो वा रंक
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || धृ ||

दोनाचा घन केला असता
मिळतो अंक आठ
मोजून होता दिशा उपदिशा
पडेल ह्याची गाठ || ८.१ ||

अंतिम तीन अंकांना जर
आठ भागत असेल
तर पूर्ण संख्येमध्येसुद्धा
बाकी काही नसेल || ८.२ ||

आठ ग्रहांनी रिंगण केले
सूर्याभोवती सतत
आठच घोडे ओढून नेती
सूर्याचा तो रथ || ८.३ ||

अष्टविनायक प्रत्येकाच्या
असती श्रद्धास्थानी
अनेक क्रिया करतो त्याला
म्हणा अष्टावधानी || ८.४ ||

शिवशाही चालवण्या करती
सहाय्य अष्टप्रधान
आठच प्यादी बुद्धीबळातील
लढती विसरून भान || ८.५ ||

अष्टांगाचे संगोपन हा प्रत्येकाचा हक्क
पाहता उघडून डोळेसती जागोजागी अंक || ८ ||

सान थोर नर नारी आणि राव असो वा रंक
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || धृ ||

किंमत ज्याची सर्वोच्च असे
अंक असा हा नऊ
अंकावलीच्या भावंडांतला
सगळ्यात मोठा भाऊ || ९.१ ||

अंकांच्या बेरजेला नऊ
भागत असेल नक्की
तर त्या संख्येस नऊ भागेल
गोष्ट आहे पक्की || ९.२ ||

शॄंगाराच्या अलंकारांत
नवरत्नांचा भार
नवरत्नांनीच भरला होता
मुघलांचा दरबार || ९.३ ||

तरूण युगुलं गिरक्या घेती
भाद्रपदी नवरात्री
गोंगाटाने प्रौढांच्या मग
नाकी नऊ येती || ९.४ ||

शृंगार करूण भयानक शांत
अद्भुत आणि बिभत्स
करूण वीर हास्य
झाले पहा ते नवरस || ९.५ ||

नऊ महिने भार सोसूनी होर्इ मग बाळंत
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || ९ ||

सान थोर नर नारी आणि राव असो वा रंक
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || धृ ||

अंकांमधला अंक वेगळा
शेवटचा तो शून्य
किंमत नाही ह्याला तरीही
तुलना नाही अन्य || १०.१ ||

शून्य अंक हा असा असे जो
धनं नाही की ऋणं
वाढत नाही काही ह्याने
होत नाही उणं || १०.२ ||

दिसतो जरी तो साधा भोळा
आहे फारच गहन
बाकी अंकांपुढती लावा
वाढत जार्इ वजन || १०.३ ||

शून्याने ह्या गुणा कुणाला
उत्तर शून्यच येतं
शून्यामध्ये भागा काही
होतील भाग अनंत || १०.४ ||

शून्याच्या ह्या सामर्थ्याने
विकसित हो विज्ञान
शून्याच्या पायावर आधारित
अन् तत्त्वज्ञान || १०.५ ||

शून्यच माझा आदि आणि शून्यच माझा अंत
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || १० ||

सान थोर नर नारी आणि राव असो वा रंक
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || धृ ||

प्राचीन काळी मानव जेव्हा
बोटे मोडत होते
दशमानाची पद्धत आली
दहाच होती बोटे || ११.१ ||

भारतवर्षी शून्य शोधले
गणिती झाली क्रांती
नगण्य वाटे शोध तरीही
जगभर झाली ख्याती || ११.२ ||

शून्यामुळेच प्रगती झाली
ऋण संख्याही आली
शून्याहूनही खाली जाता
येते ज्ञाती झाली || ११.३ ||

अपुर्णांकही आले नंतर
घडले आश्चर्य
गणिताचे मग शास्त्रज्ञांना
कळले सामर्थ्य || ११.४ ||

पैसे अंतर वजन आकार
असो कालमापन
अंकांचा सहवास नाही
टाळू शकत आपण || ११.५ ||

एके दिवशी नावे आपली जाऊन येतील अंक
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || ११ ||

सान थोर नर नारी आणि राव असो वा रंक
पाहता उघडून डोळे दिसती जागोजागी अंक || धृ ||

शेअर करा
41

आणखी असेच काही...

डिसेंबर 18, 2022

… अडलं नाही बुवा


पुढे वाचा...
जानेवारी 17, 2021

माझाच देव महान


पुढे वाचा...
डिसेंबर 22, 2018

आयुष्याचं गणित


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो