
अफूची गोळी
जानेवारी 15, 2016
कठीण प्रश्न
जून 3, 2016सोयीस्कर देशभक्ती

आपल्या देशभक्तीच्या संकल्पना अगदी ठसठशीत आहेत. देशदर्शक कोणत्याही प्रतीकाला जराही धक्का लागला तर आपण ते खपवून घेत नाही. मात्र देशप्रेमाची भावना कायदे आणि नियम पाळण्याच्या लहान लहान कृतीमधून जास्त दृगोच्चर होऊ शकते हे आपण ‘सोयीस्कर’पणे विसरत तर नाही ना?
अडचणीच्या घोषणा देतो दहा विद्यार्थ्यांचा समूह कुठला
देशप्रेमाच्या भावनेने सारा देश पेटून उठला
सर्वांनी निर्णय दिला त्या विद्यार्थ्यांना तुरूंगात सडवा
नाहीतर सर्वांना सरळ फासावर चढवा
त्या देशद्रोह्मांविरूद्ध सात्विक संताप अनावर झाला
व्यक्त करण्याकरता जो तो सामाजिक माध्यमांवर आला
कर्ज बुडवणारा कारखानदार आला
कर बुडवणारा दुकानदार आला
कॉपी करणारा विद्यार्थी आला
भेसळ करणारा व्यापारी आला
सिग्नल तोडणारा वाहनचालक आला
हातपाय तोडणारा गुंड आला
रस्त्यावर थुंकणारा कामगार आला
सिगारेट फेकणारा व्यवस्थापक आला
लाच घेणारा अधिकारी आला
लाच देणारा कंत्राटदार आला
खोटे पुरावे देणारा वकील आला
‘कट’ घेणारा डॉक्टर आला
चायपानी मागणारा पोलीस आला
डोनेशन मागणारा मुख्याध्यापक आला
पैसे घेऊन मतदान करणारा निम्नवर्ग आला
मतदानच न करणारा उच्च वर्ग आला
स्विस बँकेत पैसे ठेवणारा उद्योगपती आला
मुलांना परदेशात स्थायिक व्हा सांगणारा एक्जिक्युटीव आला
परधर्मीयांना घर नाकारणारा सोसायटीचा सेक्रेटरी आला
परजातीयाचे स्थळ नाकारणारा मुलीचा बाप आला
हुंडा मागणारी मुलाची आर्इ आली
सासूचा छळ करणारी मुलाची बायको आली
पाकिटमार आला दरवडेखोर आला
हत्यारा आला बलात्कारी आला
प्रत्येकाची देशप्रेमाची व्याख्या होती सुस्पष्ट आणि नीट
देशप्रेम म्हणजे झेंडा देशप्रेम म्हणजे राष्ट्रगीत
त्या मुलांचीही काही बाजू असेल असे कुणालातरी सुचले
पण हे विचार देशभक्तांना मुळीच नाही रूचले
असे सुचविणार्यालाच सर्वांनी ठरविले देशद्रोही
सर्व देशाच्या रोषास पात्र ठरला तोही
देशभक्तीची परिमाणे बदलून कशी चालतील
उगीच सर्वांना कायदे आणि नियम पाळावे लागतील
त्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांना दाखवून देऊ झुंडशाहीची शक्ती
आणि सुखेनैव झोपून जाऊ उशाला घेऊन आपली सोयीस्कर देशभक्ती