आपण एक काम करूया
मे 19, 2017आली निवडणूक
एप्रिल 10, 2019सुखाचा प्रवास
अनिवासी भारतीय बांधवांची आठवण ठेवून आज ‘प्रवासी भारतीय दिवस’ साजरा केला जातो. अनिवासी भारतीयांत मराठी मंडळी बरीच आहेत. आणि अनिवासी भारतीयांचा प्रवास म्हटलं की विमानप्रवासही आलाच. तर अशाच एका विमान कंपनीने एका मराठी कवीला अध्यक्षपदावर नेमलं. मग काय! नवीन राजाच्या राज्यात विमानातील उद्घोषणाही मराठी कवितेतून करण्याची टूम निघाली…ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/K0pNGJZrcOk ह्या ठिकाणी ऐकता येईल.
विमानात तुम्ही आमुच्या येता हर्ष होई अपार
नमस्कार हो प्रवासी बांधव सप्रेम नमस्कार ॥ धृ ॥
विमान आपुले तयार आहे करण्याला उड्डाण
दीड तासभर समय संपता येई गंतव्य स्थान
मेज समोरील बंद करावे बांधा ह्याची गाठ
पाठ आसनाचीही करावी लगेच तुम्ही ताठ
वरच्या कप्प्यामध्येच ठेवा जिन्नस तुमचे सारे
पट्टा आवळूनी घट्ट आसनी नंतर शांत बसा रे
तुमच्या खिडकीवरील आवरण आता खुलेच ठेवा
फोन आणखी संगणकाला थोडा आराम द्यावा
धुम्रपान मद्यपानबंदीस कायद्याचा आधार
नमस्कार हो प्रवासी बांधव सप्रेम नमस्कार ॥ १ ॥
सुरक्षाविधी सांगू इच्छिते नीट आता ऐकावे
पुढल्या पिशवीत तक्ता आहे त्यास तुम्ही वाचावे
पट्ट्याचे बक्कल खटक्याने बंद होतसे असे
पट्टी उचलता उघडे तरीही बांधून ठेवा कसे
विमानामध्ये दाब हवेचा काही कारणे घटे
समोर पडतील तुमच्या वरूनी प्राणवायू मुखवटे
ओढून नाकावरती लावून नियमित घ्यावा श्वास
आधी स्वत:चे संरक्षण मग परोपकारी ध्यास
पुढे मध्ये आणि मागे आहे संकटकालीन द्वार
नमस्कार हो प्रवासी बांधव सप्रेम नमस्कार ॥ २ ॥
वैमानिक मी तुमची करिते अभिवादन यात्रीहो
आरामदायी प्रवास तुमचा अशी मला खात्री हो
पस्तीस सहस्र फुटांवरूनी जात आहे विमान
स्वच्छ आभाळी विहरत आहे जरी ते वेगवान
तापमान बाहेरील आहे शून्याखाली पस्तीस
विमानातले तापमान पण असे सुखद पंचवीस
इच्छित जागी निरभ्र आहे आसमंत तो खुला
सहज आक्रमू योग्य वेळेत मार्ग आता आपुला
तोशिस पडता लगेच सांगा आम्हां तुमचे विचार
नमस्कार हो प्रवासी बांधव सप्रेम नमस्कार ॥ ३ ॥
सांगण्यास आनंद वाटतो आले इच्छित स्थान
तीस अंश सेल्सियस आहे बाहेर तापमान
पट्टा उघडू नका जोवरी मिळत नाही संकेत
डोक्यांवरील कप्पे उघडा नीट काळजी घेत
नीट तपासा वस्तू कोणती चुकून राहिली नाही
भेटा आमुच्या कर्मचाऱ्यांस मदत लागली काही
प्रवास तुमचा सुखकर आम्हा एकच अमुल्य ठेवा
संधी मिळावी पुन्हा कराया अशीच तुमची सेवा
वैमानिक अन् इतर आम्ही म्हणतो पुन्हा आभार
नमस्कार हो प्रवासी बांधव सप्रेम नमस्कार ॥ ४ ॥
विमानात तुम्ही आमुच्या येता हर्ष होई अपार
नमस्कार हो प्रवासी बांधव सप्रेम नमस्कार ॥ धृ ॥