आळस
मे 6, 2011तारीख
नोव्हेंबर 4, 2011षंढ
“तुमच्या घरी सगळे सुखरूप आहेत ना? … बरं झालं … आम्हीही सगळे घरीच आहोत.” झालं … आपण मोकळे … टीवीवर दाखवली जाणारी रक्तरंजित दृश्य पाहायला … हतबल, मुर्दाड, ‘षंढ’!
दचकून जागा झालास होती मध्यरात्र बहुतेक
रस्त्यावरची कर्णकर्कश मिरवणूक ती एक
बाळ तुझे मग रडू लागले वैतागून तू गेलास
दूषणं दिली प्रशासनाला एक नाही अनेक
गेलास नंतर निमूटपणे अन् खिडकी केलीस बंद
स्वत:चीच फसगत करीशी तू असा कसा रे षंढ || १ ||
ऑफिसकरता काढलीस गाडी ट्रॅफिक जाम सारा
अपघात झाला होता तुझा चढत होता पारा
लोक धावत होते काही मदत करण्यासाठी
फुटपाथवरून गाडी काढून केलास तू पोबारा
ऐकूच आला नाही तुजला जखमींचा आक्रंद
स्वत:चीच फसगत करीशी तू असा कसा रे षंढ || २ ||
पत्नीसंगे फिरण्याकरता जाशी समुद्रावरती
गप्पा मारत बसल्या होत्या तेथे काही युवती
छेडत होते तेथे त्यांना काही मवाली गुंड
दिसलंच नाही तुला चालता वाढवलीस तू गती
तुझ्या मनातील पौरूष्यच जणू पडलं आहे थंड
स्वत:चीच फसगत करीशी तू असा कसा रे षंढ || ३ ||
पाणी जातं वीजही जाते पोलीस खाती पैसे
राजकारणी गबर असे ते ठाऊक आहे कैसे
रस्ते खणले नसतील तेव्हा मंडप त्यावर मोठे
अशीच चाले लोकशाही अन् उत्तर मिळते ऐसे
तरीही तुजला वाटत नाही करून उठावे बंड
स्वत:चीच फसगत करीशी तू असा कसा रे षंढ || ४ ||
आतंकाचा वणवा करतो स्फोटामागून स्फोट
किती उमलत्या आयुष्यांना पाजी विषाचे घोट
शरीरांचे विच्छिन्न भाग ते पाहून मनात रडसी
हात बांधूनी घेशी आणिक शिवून टाकसी ओठ
करतील कुणीतरी काहीतरी अन् देश राहील अखंड
स्वत:चीच फसगत करीशी तू असा कसा रे षंढ || ५ ||
एक सांगतो ऐकून मिळेल शांती तुझ्याही मना
तुझ्यासारखे असंख्य असती ज्यांना नाही कणा
कुटुंब आपुले सोडून त्यांना दिसतच नाही काही
पौरूष्याच्या व्याख्येची ते करतात विटंबना
अन्यायाच्या समोर संवेदनाच तुमच्या मंद
स्वत:चीच फसगत करीशी तू असा कसा रे षंढ || ६ ||