स्त्रीमुक्ती
मार्च 3, 2015आभार
एप्रिल 3, 2015शेतकरी राजा
‘अन्नदाता सुखी भवं’ असं सुभाषित आहे. मात्र आपल्या देशातील अन्नदात्या शेतकऱ्याच्या दुःखाची जाणीव आपल्या सारख्या अ-शेतकरी समाजाला खरंच आहे का? आपल्या बायका-मुलांना वाऱ्यावर सोडून आर्थिक कारणाकरता जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते, तेव्हा त्या दिवसापर्यंत त्या व्यक्तीने सहन केलेल्या दडपणाची आपण कल्पना करू शकतो. कृषीप्रधान देश अशी ओळख असलेल्या आपल्या देशात ह्या ‘शेतकरी राजा’ची परिस्थिती कधी सुधारेल का?
फार पूर्वी आदिमानव खात होते फळं
शिकार मिळाली तर ठीक नाहीतर कंदमुळं
वापरली टोळीने एका अपुली तेव्हा अक्कल
बिया पेरून पिकवण्याची अशी नामी शक्कल
शेतात अन्न पिकवण्यात होता मोठा मजा
स्वत:लाच पोसू लागला शेतकरी राजा || १ ||
एकाच जागी राहून मात्र प्रश्न मोठा आला
पळून जाऊ शकत नव्हता हल्ला जर का झाला
स्वसंरक्षण केल्यावाचून काम ते चालेना
टोळीने मग आपल्यातूनच उभी केली सेना
सैनिकांना शेतीच्या कामाची होती रजा
सेनेला मग पोसू लागला शेतकरी राजा || २ ||
जास्त तोंडं खाणारी अन् शेतकरी ते कमी
पोसेल शेती ह्मा सर्वांना नव्हती ह्माची हमी
शेतीच्या अवजारांकरता आले बलुतेदार
काही बनले सुतार लोहार तर काही कुंभार
शेतावरच्या कामामधून तेही झाले वजा
बलुतेदार पोसू लागला शेतकरी राजा || ३ ||
तोंडं वाढली खाणारी अन् जमिनीची टंचार्इ
जिंकून घेण्या नवीन जागा सेना वाढत जार्इ
दिशा सेनेला दाखवण्या नेता होता हवा
टोळीने मग आपल्याकरता नेमला राजा नवा
शेतावरती काम कधी करील का कुणी राजा
राजालाही पोसू लागला शेतकरी राजा || ४ ||
राजा म्हणतो राज्य माझे मोठे व्हायला हवे
गरज नसतानाही प्रदेश जिंकून घेतले नवे
वाढत गेले राज्य वाढली त्याची कार्यवाही
चालवण्या मग कार्यवाही आली नोकरशाही
शेतात काम करण्याकरता वाटती त्यांना लाजा
नोकरशाही पोसू लागला शेतकरी राजा || ५ ||
उद्योगधंदे काढी कोणी कोणी खेळे खेळ
कोणी कलाकार कोणी राजकारण करेल
श्रीमंतीत न्हाती पैसे खेळू लागले हातात
काळजी नाही कोणा कुठून जेवण येर्इ ताटात
सारे मिळून संस्कृतीच्या अशा मारती गमजा
संस्कृतीही पोसू लागला शेतकरी राजा || ६ ||
मोठे मोठे हुद्दे आणि मोठं मोठं वेतन
जगण्यासाठी प्रत्येकाला लागे मात्र जेवण
प्रत्येक जण म्हणतो आहे मोठं माझंच काम
दिसत नाही कोणालाही शेतकर्याचा घाम
जिंकत गेले सारे शेतकरी भोगतो सजा
बाकी सारे तॄप्त उपाशी शेतकरी राजा || ७ ||
सारे जाती आपल्या आपल्या काममध्ये रमून
पोसून ह्मा सार्यांना आपला राजा गेला दमून
घाम गाळून घरचे सारे शेतावरती खपती
वर्ष सरत नाही आणि बँक आणते जप्ती
एक दिवस निघतो तो न करता गाजावाजा
फास लावून घेतो शेतात शेतकरी राजा || ८ ||