कठीण प्रश्न
जून 3, 2016आपण एक काम करूया
मे 19, 2017व्यसन
माकडापासून मानव उत्क्रांत होताना शेपटी हा शरीराचा एक अवयव गेला पण व्यसन हा मनाचा एक अवयव मात्र चिकटला. बढाईखोरांचं “मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही.” इथपासून “मी WhatsApp दिवसातून फक्त तीनदाच check करतो.” इथपर्यंत स्थित्यंतर आपण बघितलं आहे. सर्व व्यसनांपासून मुक्ती ही एक अद्भुतरम्य कल्पना आहे. व्यसनामुळे आपल्याला आनंद मिळत असताना दुसऱ्यांना त्रास होऊ नये एवढी काळजी मात्र नक्कीच घेता येईल . . .
व्यसन नावाच्या सापळ्यात मोह
मांसाचा तो तुकडा
सुटणं कठीण असतं जर
पाय पडला वाकडा || १ ||
व्यसन नावाच्या सापळ्यायाचं
मायावी ते रूप
लक्षात येतं तेव्हा उशीर
झाला असतो खूप || २ ||
व्यसन नावाच्या सापळ्याचे
असतात खूप प्रकार
बाहेरख्यालीपणापासून
सिगरेट दारू जुगार || ३ ||
व्यसन असतं झोपण्याचं अन्
व्यसन खात राहण्याचं
व्यसन असतं बोलण्याचं अन्
व्यसन धन कमावण्याचं || ४ ||
व्यसन टीवी बघण्याला
म्हणणार नाही कोण
टीवी बंद झाला तरीही
हाती असतो फोन || ५ ||
व्यसन कॉम्प्युटरचं असलं
तहान नाही भूक
माणसं झाली बेटं
कारण नाती झाली मूक || ६ ||
व्यसन चांगलं कोणतं आणि
कोणतं व्यसन वार्इट
हे ठरवायचे अधिकार बघा
तुम्हा आम्हा नाहीत || ७ ||
व्यसन कशास म्हणायचं ते
ठरवतो हा समाज
उघड करण्या असल्या गोष्टी
मग वाटते लाज || ८ ||
व्यसन असंही असू शकतं
समाजास जे मान्य
सापळाच असतो तोही एक
नसतं काही अन्य || ९ ||
व्यसन असतं काही जणांना
करत रहातात मदत
त्यांच्याशिवाय समाजाची
वार्इट होर्इल गत || १० ||
व्यसन म्हणा त्याला ज्याने
अपाय स्वत:ला होतो
व्यसन म्हणा त्याला ज्याने
त्रास दुजाला होतो || ११ ||
व्यसन नसतं ते जे
मनास आनंद देतं
व्यसन नसतं ते जे
दुसर्यास मदत करतं || १२ ||
व्यसन देतं नशा
जी असते मनातली
दारूत नशा असती तर
नाचेल की बाटली || १३ ||
व्यसन मला लागलंय
कविता लिहीत असतो
जास्त त्रास देत नाही
आता आटोपतो || १४ ||