कायदा पाळणारा गाढव
मे 15, 2015मत्सर
जुलै 17, 2015वीकएंड
फार फार पूर्वीचे मध्यमवर्गीय म्हणे सिनेमे बघणं, आप्त-मित्रांच्या भेटीला जाणं, खरेदी करणं, मुलांचा अभ्यास घेणं, रेडिओ ऐकणं वगैरे गोष्टी आठवड्यातील कोणत्याही दिवशी करायचे. मग हे ३० / ४० / ५० वर्षांपूर्वीचे मध्यमवर्गीय आदिमानव वीकएंडला करायचे तरी काय?
ऑफिसमध्ये केबिन लॅपटॉप स्मार्टफोनचा थाट
पण दिवस ढकलतोय बघत वीकएंडची वाट || धृ ||
पोटात गोळा उठतो जेव्हा येतो सोमवार
पाय ओढत पडतो बाहेर स्टार्ट करतो कार
पॉश आहे कार त्याला गॉगलची काच
दिसतात ऑफिसमधले दिवस कामाचे पाच
काम येतं अंगावरती लाटेमागून लाट
दिवस ढकलतोय बघत वीकएंडची वाट || १ ||
नवीन काही घडत नाही तसाच दिवस सरे
अनुभव एवढा मोठा माझा शत्रू तोच ठरे
रोज रोज कंटाळवाणं काम तेच तेच
लोक तेच तेच आणि तेच तेच पेच
आठ वाजले तरी काम सोडत नाही पाठ
दिवस ढकलतोय बघत वीकएंडची वाट || २ ||
निघतो तेव्हा घरामध्ये सगळ्यांचीच घार्इ
घरी पोहोचेपर्यंत घरात निजानीज होर्इ
वाटतं कधी घ्यावा आपण मुलांचा अभ्यास
घरी वेळ मिळतो केवळ गिळण्या दोन घास
समजत नाही बघता बघता कधी होते रात
दिवस ढकलतोय बघत वीकएंडची वाट || ३ ||
आवडत नसतानाही अजून करतोय माझं काम
एक तारीख पगाराची म्हणून गाळतोय घाम
सीए म्हणतो डान्सर व्हायचंय आणि वकील पेंटर
इंजिनिअरला क्रिकेटर तर डॉक्टर म्हणतो ॲक्टर
अशी कशी लागली आहे आयुष्याला नाट
दिवस ढकलतोय बघत वीकएंडची वाट || ४ ||
सातामधले पाच दिवस म्हणजे सत्तर टक्के
आयुष्य इतकं वाया जातंय रोज खात धक्के
दोन दिवस आयुष्यातले करण्याकरता मजा
उरलेले ते पाच दिवस केवढी मोठी सजा
उमेदीच्या ह्मा दिवसांमध्ये होतेय काटछाट
तरीही … दिवस ढकलतोय बघत वीकएंडची वाट || ५ ||
ऑफिसमध्ये केबिन लॅपटॉप स्मार्टफोनचा थाट
पण दिवस ढकलतोय बघत वीकएंडची वाट || धृ ||