आता केस पिकले
डिसेंबर 19, 2014दोन देश
जानेवारी 16, 2015लक्ष कुठे
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आधीच वेळ कमी मिळतो, त्यात एकविसाव्या शतकातील आधुनिक उपकरणांनी आपल्या उरलेल्या वेळेचाही ताबा घेतलेला आहे. आपण बोलत असताना एखाद्याचं आपल्याकडे लक्ष नसणं किंवा एखादी गोष्ट तू मला सांगितलीच नाहीस असं एखाद्याने सांगणं हे प्रकार आता वारंवार घडू लागले आहेत. साध्या साध्या गोष्टीतही ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाना’ म्हणावं लागत आहे . . .
आजकालचा माणूस हरपे मेंदूवरती चढती पुटे
नजर कुठे अन् लक्ष कुठे || धृ ||
पत्नी सांगे घरकामाची बार्इच आली नाही
दूरचित्रवाणीसंचाला माणूस बेदम पाही
पत्नी करते तणतण खापर घरच्या भांड्यांवरती फुटे
नजर कुठे अन् लक्ष कुठे || १ ||
शाळेमधली गंमत सांगत मुलगी थुर्इथुर्इ नाचे
महाशयांची नजर मात्र संदेश फोनवर वाचे
हिरमुसलेल्या कन्येचे त्या काही क्षणांतच उदय तुटे
नजर कुठे अन् लक्ष कुठे || २ ||
समोरचा तो लाल दिवा बघता बघता हो हिरवा
शेजारील गाडीतील ललना बघत बने पारवा
पाठीमागच्या गाड्यांमधूनी भोंग्यांचे मग मोहोळ उठे
नजर कुठे अन् लक्ष कुठे || ३ ||
साहेबाच्या सवे बैठकीत गमजा करी तो थोर
कान मात्र लागून राहती काय आपुला स्कोर
वर्षअखेरी म्हणून टाकतो धोरण आमुचे आडमुठे
नजर कुठे अन् लक्ष कुठे || ४ ||
एकविसाव्या शतकामध्ये कसे राहावे दक्ष
सहस्र गोष्टी आजूबाजूच्या विचलित करती लक्ष
एकचित्त मग कसे बनावे मनामध्ये हा प्रश्न उठे
नजर कुठे अन् लक्ष कुठे || ५ ||
आजकालचा माणूस हरपे मेंदूवरती चढती पुटे
नजर कुठे अन् लक्ष कुठे || धृ ||