मत्सर
जुलै 17, 2015चांगलं तेवढं घ्यावं
ऑक्टोबर 2, 2015युधिष्ठीर आणि दुर्योधन
‘सर्वसाधारण नागरिक भ्रष्टाचारामुळे भरडला जात आहे’ ह्याबाबत सर्वांचं एकमत आहे. पण अनेकदा सर्वसाधारण नागरिकाला भरडणाराही एक सर्वसाधारण नागरिकच असतो असा अनुभव येतो. भ्रष्टाचार म्हटलं की आपण लगेच राजकारण्यांच्या नावाने बोटं मोडतो पण नीट डोळे उघडून पाहिलं तर आजूबाजूला प्रत्येक पातळीवर भ्रष्टाचार सुरु असल्याचं जाणवतं. मग भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन व्हावं असं नक्की कोणाला वाटतंय?ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/pCaVDvsMjP4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
सरकार दुर्योधनाने अडचणींमागून अडचणी आणल्या
युधिष्ठीर उद्योगपती जेव्हा कारखान्याची परवानगी घ्यायला गेला
उद्योगपती दुर्योधन कारणांमागून कारणं देत राहिला
युधिष्ठीर गावकर्यांनी त्याला जेव्हा नदीच्या दूषित पाण्याची समस्या सांगितली
गावकरी दुर्योधनांनी सरळ नकार दिला
युधिष्ठीर शाळाव्यवस्थापकांनी जेव्हा शाळेकरता जमीन मागितली
शाळाव्यवस्थापक दुर्योधनाने भरमसाठ देणगी मागितली
युधिष्ठीर रिक्षाचालक जेव्हा मुलाला शाळेत घालण्याकरता गेला
रिक्षाचालक दुर्योधनाने मीटरमध्ये केला होता फेरफार
युधिष्ठीर कारकून जेव्हा रिक्षाने स्टेशनवरून घरी गेला
कारकून दुर्योधनाने कार्ड देण्यापूर्वी चहापाण्याकरता पैसे मागितले
युधिष्ठीर पोलीस जेव्हा रेशन कार्ड बनवायला गेला
पोलीस दुर्योधनाने गाडी अडवून लाच मागितली
युधिष्ठीर डॉक्टरची गाडी जेव्हा चुकून सिग्नल तोडून पुढे गेली
डॉक्टर दुर्योधनाने उगीच शस्त्रक्रिया करायला भाग पाडलं
युधिष्ठीर वकील जेव्हा पोटाचा आजार दाखवायला गेला
वकील दुर्योधन कोर्टाकडून तारखांमागून तारखा घेत राहिला
युधिष्ठीर शेतकरी जेव्हा जमिनीच्या तंट्याकरता त्याच्याकडे गेला
शेतकरी दुर्योधन सवलतीमागून सवलती घेत राहिला
युधिष्ठीर सरकारने जेव्हा योजना जाहीर केल्या
जिथे सारेच युधिष्ठीर आपापल्या कामात दुर्योधन बनतात
तिथे भ्रष्टाचार नक्की कोणाला नकोय?
मी उन्नाीस अप्रामाणिक मी बीस अप्रामाणिक
बस! फरक इतकाच
डोंगराला आग लागली पळा रे पळा
सगळेच म्हणतायत … एका हातात पेटता पलिता घेऊन
हे चक्र भेदण्याकरता आत कोण शिरू देणार?
मुळात … ह्या चक्राच्या बाहेर कुणी आहे काय?