आभार
एप्रिल 3, 2015कायदा पाळणारा गाढव
मे 15, 2015मोकळा वेळ
हल्ली आपल्यातील बहुतेकांचा दिवस जातो संध्याकाळ होण्याची वाट बघण्यात, आठवडा जातो शनिवारची वाट बघण्यात, वर्ष जातं त्या एका पंधरा दिवसांच्या सुट्टीची वाट बघण्यात. मात्र ती संध्याकाळ, ते शनिवार, रविवार, ती सुट्टी जेव्हा येते तेव्हा तरी आपल्याला मोकळा वेळ मिळतो का?
तुम्हाला हल्ली मोकळा वेळ मिळतो का?
अंहं… रात्री मोजून मापून टीवी बघायला मिळणारा नव्हे
शनिवार रविवारी घरच्या कामाकरता मिळणारा नव्हे
वर्षातून एकदा सुट्टी घेऊन पहाटे पाच वाजता
उठायला लावणार्या कण्डक्टेड टूर्समध्ये मिळणारा… तोही नव्हे
मोकळा म्हणजे खरोखर मोकळा
लहानपणी मुंग्यांची रांग बघण्याकरता मिळायचा… तसा
शाळेत उन्हाळ्याच्या सुट्टीत वाळत घातलेल्या पापडांची राखण करताना मिळायचा… तसा
कॉलेजच्या दिवसांत स्टेशनवरून घरी रमत गमत पायी येताना मिळायचा… तसा
सतत भुंगा… काय करत होतो, काय करतोय,
काय करायचं आहे… केव्हा केव्हापासून केव्हापर्यंत
एक मालगाडी… न संपणारी
दोन डब्यांच्या फटीतून दिसणारं पलीकडंचं दृष्य… लक्षात येण्यापूर्वीच पुढचा डबा …
कधी घराच्या खिडकीतून आकाशातील ढग पाहिले आहेत?
कधी घरात जमिनीवर लोळत सीलिंगवरची जळमटं पाहिली आहेत?
कधी आपल्याच मळहातावरच्या केसांची रचना पाहिली आहे?
वेळेचा पिझ्झा… वाटून दिलेला
कुटुंब ऑफिस मित्र घरची कामं करमणूक प्रवास…
तुकडे… काही लहान काही मोठे
दोन त्रिकोणांमध्ये पडलेला चुरा… मोकळा वेळ!
वेळेची परिमाणं… दिवस महिने वर्षं वाढत गेले
आणि वेळ मात्र हरवून गेला… सुखात यशात पैशात