परकी मावशी
फेब्रुवारी 15, 2013टोणगा
जुलै 19, 2013मन
एक वेळ धूर मुठीत धरून ठेवणं जमेल, पाणी झारा वापरून भरणं जमेल, वाळू ओंजळीतून नेणं जमेल … पण मन ताब्यात कसं ठेवावं? काही जण मनन चिंतन करतात, काही जण साधू-बाबांचा आसरा घेतात. कुणी योग तर कुणी व्यायाम करतात. तुम्हा कोणाला जमलंय का ह्या मनाला वेसण घालणं?
दिवसभर असा
सोडला नाही वसा
संध्याकाळ झाली
खाल्लाच सामोसा
डाॅक्टर सांगतात मला
कमी करा वजन
यत्न केले पण
ताब्यात नाही मन || १ ||
एक आज तरी
लवकर ये ना घरी
सकाळी विनवणी
बायको माझी करी
संध्याकाळी प्यायला
बसलो मित्रगण
यत्न केले पण
ताब्यात नाही मन || २ ||
समोरची ती बार्इ
बघतसुद्धा नाही
माझी नजर मात्र
तिथेच सारखी जार्इ
सुंदर माझी पत्नी
जपते तन आणि मन
यत्न केले पण
ताब्यात नाही मन || ३ ||
मुलं गोंडस भारी
भेटतात पण रविवारी
बाकी ती बायकोचीच
सारी जबाबदारी
ऑफिसच्या कामाचं
नेहमीचंच दडपण
यत्न केले पण
ताब्यात नाही मन || ४ ||
आहे रक्तदाब
साधी नाही बाब
चिडचिड होते जरी
नसतो काही लाभ
रागावरती कसं
ठेऊ नियंत्रण
यत्न केले पण
ताब्यात नाही मन || ५ ||
डॉक्टर म्हणती थेट
इस्पितळातच भेट
तरीही खाली येऊन
पेटवली सिगरेट
आहे मोठा धोका
सांगती सर्वजण
यत्न केले पण
ताब्यात नाही मन || ६ ||
वॄद्ध वडील घरी
तब्येत नाही बरी
मन दुखावेल असं
बोललं जातं तरी
आर्इनंतर त्यांनीच
केलंय संगोपन
यत्न केले पण
ताब्यात नाही मन || ७ ||
मन वढाय वढाय
करू काय उपाय
वेसण घालीन म्हणतो
पण उधळतच ते जाय
चपळ आहे फार
निसटतं पटकन
यत्न केले पण
ताब्यात नाही मन || ८ ||