परतफेड
नोव्हेंबर 1, 2013जीवाचं मोल
फेब्रुवारी 7, 2014प्रमोशन
जानेवारी महिना आला की बहुतेक सर्व संस्थांमध्ये appraisalचे वारे वाहू लागतात. ह्या वेळी प्रमोशनच्या यादीत माझं नाव असेल का? हा प्रश्न सर्व नोकरपेशांना छळू लागतो. जितकी वरची जागा तितकी प्रमोशनची शक्यता कमी. मग वर्षभर केलेल्या अट्टाहासाचा आढावा घेतला जातो . . .
सालाबादप्रमाणे यंदाही अपेक्षेनुसार गाणं झालं बंद
ऐकून आम्ही सगळेच पळू लागलो अंदाधुंद
वर्षभर त्या गाण्याच्या तालावर सरकत होतो आम्ही
सगळे मिळून दहा, खुर्च्या मात्र पाच होत्या कमी
प्रत्येकाचं वागणं जसं दुसरा असावा सख्खा भाऊ
मनात मात्र विचार, ह्माच्या पुढे कसा जाऊ
समोरासमोर आलो की एकमेकांना पाहून हसत होतो
त्याच वेळी मनात त्यांना हरवण्याचा कट रचत होतो
गाणं होतं डोंगराला आग लागली पळा रे पळा
तयार होतो कापायला एकमेकांचा केसाने गळा
सभोवती उभं राहून बायको मुलं टाळ्या पिटत होती
दमून थांबलो तर त्यांचं काय होर्इल ह्माची काळजी होती मोठी
गाणं बंद झाल्यावर बेभानपणे घातला एकच धुमाकूळ
मला खुर्ची मिळाली आहे हे समजेपर्यंत बसली होती आजूबाजूची धूळ
काही पडले काही जखमी झाले तरी सगळं होतं क्षेम
सारं काही क्षम्य होतं पण हे नक्कीच नव्हतं प्रेम
दहापैकी पाचच होते आता त्या खेळात बसले
बाकीचे हरलेले जाताना आमच्याकडे पाहून बळेबळेच हसले
नोकरी लागल्यापासून दरवर्षी खेळ खेळत होतो हाच
शंभराच्या पंचवीसच्या दहा होत, आता खुर्च्या राहिल्या होत्या पाच
प्रत्येक नवीन खुर्चीवर लटकत होती आणखीन मोठी गाजरं
दहांवर होती एअरकंडिशण्ड गाडी, पाचांवर घर होतं साजरं
पहिल्या दिवसापासून प्रत्येक जण होता ह्माच खेळाला जुंपला
आणि आज जिंकलेल्यांबरोबरच हरलेल्यांचाही खेळ नव्हता संपला
मॅनेजमेंटच्या कौतुकाने आम्हाला धन्य लागलं वाटू
जेते होतो आम्ही आपल्या जखमा लागलो चाटू
श्वास घेतोय तोच मॅनेजमेंट नवीन गाणं वाजवी
धावताना समजलं नाही, गाणं तेच होतं फक्त सीडी होती नवी
विचार करायला वेळ नव्हता ही संधी शेवटची होती बहुतेक
चार गायब झाल्या होत्या, आता खुर्ची उरली होती केवळ एक