जिंकणाऱ्यांची दुनिया
सप्टेंबर 5, 2014आता केस पिकले
डिसेंबर 19, 2014नकोशी तारीख
आपला एखादा मित्र किंवा मैत्रीण असते . . . त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या तारखा आपण लक्षात ठेवतो . . . विशेषतः जन्मतारीख, लग्नाची तारीख, वगैरे . . . बाकी काही नसलं तरी ह्या तारखांना आपलं नातं घट्ट होत असतं . . . आणि एक दिवस अचानक समजतं . . . तो मित्र किंवा मैत्रीण आपल्याला सोडून ह्या जगातून निघून गेले आहेत . . . आपल्याकरता मागे ठेवून एक तारीख . . . नकोशी!
आपण दोघे शेजारी, वाढलो एकत्र
मी मोठा, वयात काही दिवसांचाच फरक होता मात्र ||
अनेक तारखांत एक तारीख असते चमत्कारिक आणि सुरस
तुझ्यामुळे समजलं त्या तारखेला म्हणतात वाढदिवस ||
शाळेत इतरही तारखा समजू लागलं आपलं मन
सुट्टी असते, ज्या दिवशी असतात राष्ट्रीय सण ||
शाळेत मग आल्या भीतीदायक काही तारखा
चाचणी, सहामाही, वार्षिक परीक्षांचा रतीब सुरू झाला सारखा ||
कॉलेजात सबमिशनची तारीख म्हणजे अग्निपरीक्षा साक्षात
तू माझ्या आणि मी तुझ्या तारखा नियमित ठेवायचो लक्षात ||
आधी मी मग तू ज्या दिवशी प्रेमात पडलो त्या तारखांनी भरला रंग
त्यानंतर आधी माझा आणि मग तुझा प्रेमभंग ||
माझं लग्न ठरलं तर म्हणालास मला सोडून जातोयस साल्या
पण मग काही दिवसांत तुझ्याही लग्नाच्या पत्रिका छापून आल्या ||
आयुष्यात दुरावलो पुढे आणि आपले संबंध झाले मंद
पण जोपासला दोघांनी एकमेकांच्या तारखा लक्षात ठेवण्याचा छंद ||
त्या निमित्ताने तरी घालायचो एकमेकांना साद
फोन, इमेल, फेसबुक, व्हॉट्सॲप… कोणत्या तरी मार्गाने व्हायचा आपल्यात संवाद ||
मुलांनी विचारलं कोण होता तुमचा बेस्ट फ्रेंड – जिवलग मित्र
की डोळ्यांसमोर यायचं तुझंच चित्र ||
आणि … एक दिवस समजलं तू ह्मा जगातून निघून गेलास
साधा निरोप घ्यायचा चान्सही नाही दिलास ||
माझ्या आधी काहीतरी करण्याची एवढी कसली घार्इ
आता माझ्या मुलांच्या प्रश्नाला उत्तरच उरलं नाही ||
तुझ्या आठवणींचं काय करू, चिंता नाही केलीस जराशी
मागे ठेवून गेलास फक्त एक तारीख … नकोशी ||