क्रिकेट आणि युद्ध
फेब्रुवारी 12, 2011दोन बाजू
घोळक्यामध्ये चर्चा करताना आपण अगदी तावातावाने एखादी बाजू मांडत असतो. अमका गाढव आहे, तमका किती हुशार आहे, हे करणंच बरोबर आहे, तो असा वागूच कसा शकतो, वगैरे. आपली मतं बिनधास्तपणे मांडताना आपल्याला त्या विषयाची संपूर्ण माहिती आहे का हे तपासायची आपल्याला गरज वाटत नाही. आपण सोयीस्करपणे विसरतो की प्रत्येक गोष्टीला आपल्याला न समजलेली दुसरी बाजूही असू शकते …
लहान मी मोठं दप्तर
त्यात सरांचा मार
मोठा जेव्हा होर्इन तेव्हा
पेलीन मोठे भार
साहेबाच्या शिव्या खातोय
बायकोस टीवी हवा
लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा
बालपणीचे दिवस कधी येत फिरून नसतात
आयुष्यात प्रत्येक गोष्टीला बाजू दोन असतात || १ ||
सासू म्हणते सुनबार्इ
घरात राहत नाही
असते जेव्हा तेव्हा कधी
मला पाहत नाही
सून म्हणते सासूबार्इंचं
प्रत्येक गोष्टीत लक्ष
जातं कधी दुध उतू
राहू किती मी दक्ष
सुखी कुटुंबाच्या त्रिकोणाला चार कोन असतात
आयुष्यात प्रत्येक गोष्टीला बाजू दोन असतात || २ ||
कामगार आजारी असला तरी
कामावर यायला हवा
कामगाराला पातळ दुध आणि
मालकाला खायला खवा
मालकाने कितीही केलं
तरी कामगारांचा खुन्नस
नफा तोटा काही होवो
आम्हाला हवा बोनस
कामगार काय मालक काय फेडायची लोन्स असतात
आयुष्यात प्रत्येक गोष्टीला बाजू दोन असतात || ३ ||
क्रेडिट कार्ड देताना
साखरेत घोळून बोलतात
पैसे दिले नाहीत तर
तिसरा डोळा खोलतात
क्रेडिट कार्ड घेताना
गहाण होती अक्कल?
कडक फोन आला आता
चालवा काहीतरी शक्कल
कर्ज घ्या, पैसे द्या सांगायला फोन असतात
आयुष्यात प्रत्येक गोष्टीला बाजू दोन असतात || ४ ||
मुलांना शिकवा प्रगती करा
रिक्षांवर छापून ठेवतात
गरिबांना शिकण्यासाठी
जागा राखून ठेवतात
जास्त मुलं जास्त कमार्इ
हिशोब आहे सोपा
खायला काळ आणि भुर्इला भार
शिक्षण नुसत्या गप्पा
जास्त लोकसंख्या जास्त मतं सरकारं मौन असतात
आयुष्यात प्रत्येक गोष्टीला बाजू दोन असतात || ५ ||
वीज नाही पाणी नाही
सरकार काय करतंय
आंधळं आपलं दळण दळतंय
कुत्रं पीठ खातंय
शुक्रवारी निवडणूक आहे
मोठा वीकएंड आला
मतदान बितदान खड्ड्यात गेलं
खंडाळ्याला चला
आम्हाला शिकवणारे हे साले राजकारणी कोण असतात
आयुष्यात प्रत्येक गोष्टीला बाजू दोन असतात || ६ ||
हा शेवटचा बाॅम्बस्फोट
नागरिक आशावादी
तुमच्याच डब्यात बसला असेल
पुढचा दहशतवादी
पन्नाास मेले, साठ मेले
पडत नाही फरक
तुमच्या देशात धुमाकूळ घालतो
आमचा क्रांतिकारक
दोन देशांच्या सीमेवर पाहा नो मॅन झोन असतात
आयुष्यात प्रत्येक गोष्टीला बाजू दोन असतात || ७ ||
प्रगती हवी असेल तर
किंमत मोजावी लागणार
आमची इमारत शाबूत पण
ती झोपडी पाडावी लागणार
गावी पडला दुष्काळ म्हणून
इथे शहरी आलो
बुलडोजरच्या पात्यापुढे
इथेही बेघर झालो
गरीबांचा अन् श्रीमंतांचा, देश दोन नसतात
आयुष्यात प्रत्येक गोष्टीला बाजू दोन असतात || ८ ||
ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम
मराठीची पुण्यार्इ भली
इंग्रजीच्या वादळापुढे
‘पळता भुर्इ’ झाली
आम्ही शिकलो मराठीत
तोटा दिसत नाही
मुलांकरता मात्र इंग्रजीला
पर्याय सुचत नाही
माती म्हणजे साॅइल आणि दगड स्टोन असतात
आयुष्यात प्रत्येक गोष्टीला बाजू दोन असतात || ९ ||
दुरून पाहा, नायकाचे
निर्णय न्याय्य असतात
जवळून मात्र मातीचेच
सारे पाय असतात
तो पहा खलनायक
आपण बोलून जातो
त्याची काही बाजू असेल
मात्र विसरून जातो
हा चांगला तो वार्इट असे शिक्के गौण असतात
आयुष्यात प्रत्येक गोष्टीला बाजू दोन असतात ||१० ||
पैसा हवा मला पैसा
झोपडीत आक्रोश उठे
घरच्यांचे चेहरे बघवत नाहीत
तोंड लपवू कुठे
सुख हवं मला सुख
महालात करूण स्वर
बायको मुलं गेली कुठे
खायला उठतंय घर
रूपया तोच असतो, पण त्याला बाजू दोन असतात
जशा… आयुष्यात प्रत्येक गोष्टीला बाजू दोन असतात || ११ ||