बाथरूममधला मी
नोव्हेंबर 2, 2012परकी मावशी
फेब्रुवारी 15, 2013डोरेमॉन
तुमच्या घरी किंवा आजूबाजूला लहान मुलं असतील तर डोरेमॉन म्हणजे कोण हे तुम्हाला सांगायची गरज नाही. नोबिता हा एक ८-१० वर्षांचा धांदरट मुलगा. तो कधीही संकटात सापडला की बाविसाव्या शतकातून आलेलं डोरेमॉन हे यंत्रमांजर त्याला एखादं जादुई उपकरण (गॅजेट – gadget) देऊन त्याची सुटका करण्यास मदत करतं. एका संकटातून दुसऱ्या संकटात जाणाऱ्या आपल्या देशाला पाहून अशाच एखाद्या डोरेमॉनची निकड फार प्रकर्षाने जाणवू लागली आहे …
आमची घरं असतात आरशासारखी लख्ख छान
पण कचरा टाकून‚ थुंकून आम्ही आमचा परिसर करून टाकतो घाण
स्वच्छता म्हणजेच आरोग्य हे गणित लहानथोरांमध्ये रूजवण्याकरता
डोरेमाॅन मला एक गॅजेट देशील काय? || १ ||
इथे आम्हाला देव दिसतो जमिनीवर उगवणाऱ्या साध्या दर्भात
पण देवीसारख्या मुलींना आम्ही मारून टाकतो गर्भात
स्त्री पुरूषांचं समाजातील स्थान समान करण्याकरता
डोरेमाॅन मला एक गॅजेट देशील काय? || २ ||
आदर्श आमचे महात्मा गांधी, श्रीराम आणि गौतम बुद्ध
पण साध्या खेळाकडेही आम्ही पाहतो जणू सुरू असावं युद्ध
खेळामधील खेळाची भावना परत आणण्याकरता
डोरेमाॅन मला एक गॅजेट देशील काय? || ३ ||
शिकवतात आम्हाला दुसऱ्याच्या दु:खात तुमचा वाटा अर्धा
पण शिक्षण आणि नोकरीधंद्यात पावलोपावली चालते आमची जीवघेणी स्पर्धा
ज्याला जे मिळतंय त्यात त्याने आनंदी राहण्याकरता
डोरेमाॅन मला एक गॅजेट देशील काय? || ४ ||
आपल्या सोसायटीच्या मीटिंगला जाणं म्हणजे आम्ही समजतो वेळ जातोय वाया
पण चर्चा मात्र करतो कसा असावा देशाच्या लोकशाहीचा पाया
समाजकारण स्वत:पासून सुरू करण्याकरता
डोरेमाॅन मला एक गॅजेट देशील काय? || ५ ||
आमच्या देशातील बेशिस्त पाहून आम्ही दात ओठ खातो
पण पोलीस नाही ना ते पाहून सहज सिग्नल तोडून जातो
त्या तोडलेल्या सिग्नलची भरपार्इ करण्याकरता
डोरेमाॅन मला एक गॅजेट देशील काय? || ६ ||
‘राखीव’ शब्द वाचला की आम्ही सुरू करतो समानतेचा जप
पण घरच्या मोलकरणीला मात्र देतो कान तुटलेला कप
लहानमोठं काम करणाऱ्यांना समान प्रतिष्ठा देण्याकरता
डोरेमाॅन मला एक गॅजेट देशील काय? || ७ ||
सहिष्णुता‚ सर्वधर्मसमभाव वगैरे व्याख्या आमच्या लाख
पण मुलांना सांगतो जातीबाहेर लग्न केलंस तर याद राख
धर्म‚ वर्ण आणि जातीच्या भिंती तोडण्याकरता
डोरेमाॅन मला एक गॅजेट देशील काय? || ८ ||
आमची संस्कृती परंपरा सर्व काही आहे महान
पण नव्यानेच जन्म झालेल्या ह्मा देशाचं वय आहे लहान
लहान वयात प्रगल्भ जनमानस तयार करण्याकरता
डोरेमाॅन मला एक गॅजेट देशील काय? || ९ ||
तशी आमच्यासारखी हुशार माणसं तुला मिLणार नाहीत कुठं
पण अनेक शतकांच्या पारतंत्य्रातील लाचारीने आमच्या मनांवर चढली आहेत पुटं
माझ्या देशबांधवांच्या मनांतील ही जळमटं दूर करण्याकरता
डोरेमाॅन मला एक गॅजेट देशील काय? || १० ||