मन
एप्रिल 5, 2013जबाबदारी
ऑगस्ट 2, 2013टोणगा
‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ ही म्हण कुणीतरी खास मध्यमवर्गीयांकरता लिहून ठेवलेली असावी. आपण मनाशी काही ठरवून मनोरथांचे इमले बांधावेत आणि व्हावं काहीतरी भलतंच ह्या गोष्टीची प्रयत्न करूनही सवय होत नाही. असेच काही टोणगे …
विचार करता समजून आला जो दगा झाला
माझ्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला || धृ ||
रोज पाहायची मला
बसस्टॉपवर ती बाला
आज विचारू उद्या
म्हणता उशीर झाला
मला मामा म्हणणारा तिला पोरगा झाला
माझ्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला || १ ||
लग्नाची मज घार्इ
स्थळ पाहाया जार्इ
आवडली जी मजला
ती निघे मुलीची तार्इ
सरता अंतरपाट घसा कोरडा झाला
माझ्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला || २ ||
माझा तो प्रतिस्पर्धी
अक्कल त्याला अर्धी
साहेबाच्या पोरीशी
केली त्याने सलगी
मी करतोय काम साहेबाचा तो सगा झाला
माझ्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला || ३ ||
नको सट्टा बाजार
असतो तो जुगार
ठाऊक तरीही एकदा
लावला पुरा पगार
पडलं पडलं मार्केट एकच ओरडा झाला
माझ्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला || ४ ||
मुलगा माझा भला
अंगी चौसष्ट कला
बाबा झालो फेल
म्हणतो हसत मला
एकमेव कुलदीपक तो ही कोडगा झाला
माझ्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला || ५ ||
सांगतात मेहनत कर
बाकी सारं विसर
स्वर्ग पाहण्याकरता
स्वत: आधी मर
सांगा नशिबावरती हा काय तोडगा झाला
माझ्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला || ६ ||
विचार करता समजून आला जो दगा झाला
माझ्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला || धृ ||