प्रमोशन
जानेवारी 17, 2014प्रेमाचा धंदा
फेब्रुवारी 21, 2014जीवाचं मोल
‘गोळ्या घातल्या पाहिजेत एकेकाला’ किंवा ‘सरळ फासावर चढवा’ असे शब्द आपल्या तोंडून किती सहजपणे निघून जातात. जगाच्या अति लोकसंख्येमुळे मृत्यूबद्दल आपल्या संवेदनाच बधीर झाल्या आहेत का?
राज्यामधील निवडणुका शांततेत पडल्या पार
सत्तावीस झाले जखमी आणि केवळ दोनच झाले ठार
रुळांवरील अपघातांची संख्या कमी झाली आहे खास
गेल्या वर्षी हजार दगावले, ह्मा वर्षी केवळ नऊशे पन्नाास
वाचून नजरेआड करतो विचार करत नाही खोल
विसरून गेलो आहोत आपण माणसाच्या जीवाचं मोल || १ ||
हरले कसे सामना एवढा आला होता हातातोंडाशी
पैसे खातात साले देऊन टाका एकेकाला फाशी
चर्चा करू या असं म्हणून आपला देश शत्रूपुढे वाकतो
धडाधड बॉम्ब टाकून शत्रूचा देश करा बेचिराख तो
किती सहज निघतात आपल्या तोंडून असे विखारी बोल
विसरून गेलो आहोत आपण माणसाच्या जीवाचं मोल || २ ||
विलन गोळी झाडतो हिरोवर मध्ये येते बहीण किंवा आर्इ
आपण म्हणतो बरं झालं हीरो काही आता मरत नाही
अंगरक्षक ठेवून असतात अतिमहत्वाच्या व्यक्ती
प्राण पणाला लावण्याची असते ह्मा अंगरक्षकांना सक्ती
थोडीच आयुष्य वाटतात आपल्याला महत्वाची आणि बाकी वाटतात फोल
विसरून गेलो आहोत आपण माणसाच्या जीवाचं मोल || ३ ||
समाजाला देतात मुंग्यांच्या वारूळाची उपमा
वारूळात नसते एका मुंगीच्या जीवाची बाकीच्यांना तमा
मात्र प्रत्येक माणूस जाणून असतो स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व
प्रत्येकाला असतात स्वत:चे विचार आणि असतं स्वत:चं व्यक्तिमत्व
माणूस गेला की केवळ त्याच्या आप्तांच्या डोळ्यास येते ओल
विसरून गेलो आहोत आपण माणसाच्या जीवाचं मोल || ४ ||
तुम्ही क:पदार्थ समजता ती व्यक्तीही कधी असेल लहान मुल
तिच्या आर्इवडिलांच्या जीवनात उमललेलं एक सुंदरसं फुल
त्या व्यक्तीचेही असतील भविष्यातील मनसूबे चार
स्वत:ला तिच्या जागी उभं करून मग करा विचार
तरच समजेल तुम्हाला प्रत्येक माणसाचा जीव किती आहे अनमोल
विसरून गेलो आहोत आपण माणसाच्या जीवाचं मोल || ५ ||