टोणगा
जुलै 19, 2013मिच्छामी दुक्कडम
सप्टेंबर 6, 2013जबाबदारी
स्वातंत्र्यदिन साजरा करणं हा आता केवळ एक उपचार राहिला आहे. सिग्नलला गाडी थांबवून झेंडा विकत घेणं म्हणजे स्वातंत्र्यदिन . . . महत्प्रयासाने मिळालेलं हे स्वातंत्र्य टिकवण्याकरता आपली काही जबाबदारी आहे हेच आपण विसरत चाललो आहोत.
काम करायला घे आधी तू विचार करत बस मग
देशाची ह्मा जबाबदारी थोडी तरी घेऊन बघ || धृ ||
बसथांब्याच्या समोर कोणी कचरा होता टाकला
आयला काय घाण येतेय करवादूनच तो वदला
सुधारणारच नाहीत कधीही माणसं ही आपल्याकडची
तोंड वाकडं करत मग तो तिथेच पचकन थुंकला
बोलला इथली घाण बघून काय म्हणत असेल जग
अरे निदान पायाखालची जमीन स्वच्छ ठेवून बघ || १ ||
मंदिराच्या रांगेमध्ये मित्र उभे होते चार
गप्पा रंगल्या होत्या त्यांच्या विषय होता भ्रष्टाचार
पुजार्याला पाहून एक हळूच म्हणाला दुसर्याला
पैसे देऊन आधी दर्शन मिळेल का ते जरा विचार
लाच देणारे घेणारे दोघे असतात तितकेच ठग
नियम असतात सगळ्यांकरता त्यांचं पालन करून बघ || २ ||
तासभराच्या ट्रॅफिक जॅमने जीव त्याचा घुसमटला
शिस्त नाही कोणालाही स्वत:शीच तो पुटपुटला
सिग्नल तोडून पुढे निघाला पोलिसाने हटकलं
हळूच त्याला पन्नाासाची नोट देऊन निसटला
पावलो पावली दाखवतोस का आपल्या श्रीमंतीची रग
चूक होता पावती घेऊन खरा दंड भरून बघ || ३ ||
एवढा मोठा देश एका पदकासाठी तळमळतो
कामगिरी त्या चीनची पाहून प्रत्येक जीव जळफळतो
कारण शोधण्यासाठी एक प्रश्न विचार स्वत:लाच
आपल्यापैकी प्रत्येक जण नोकरीमागे का पळतो
दहावीच्या मार्कांसाठी सगळ्यांची असते तगमग
खेळात नाव कमव मुलाला प्रोत्साहन तर देऊन बघ || ४ ||
दमून आलो घरी जेवून झाली होती निजानीज
नुकताच डोळा लागला होता आणि गेली घरची वीज
देश प्रगती करतोय म्हणे सगळ्या त्या नुसत्या गप्पा
चिडून स्वत:ला बोललो टाकतो विकून घरचे टीवी फ्रीज
मंत्य्रांनाही लागली पाहिजे तापत्या उन्हाळ्याची धग
पण आधी आपल्या घरचे पंखे दिवे बंद करून बघ || ५ ||
शहर सुंदर करा आधी झोपडपट्टी ती उठवा
गरिबी हटण्यासाठी आधी गरिबांना तुम्ही हटवा
नार्इलाज आहे म्हणून तुम्ही टिकला आहात इथे
देश गरीब म्हणून मुलांना परक्या देशाला पाठवा
स्वत:साठी जगलास तसा कधी दुसर्यासाठी जग
एका गरीब कुटुंबाला जरा मदत करून बघ || ६ ||
कधीतरी ह्मा देशासाठी काम कर जरा छानसं
महत्त्वाचं ठरेल ते जरी असेल बघ तू लहानसं
तुझा आहे देश तुलाच सुधारायचा आहे हा
देश म्हणजे असतात पाहा देशामधलीच माणसं
एवढा मोठा देश आपला सुधारेल का लगोलग
पण चांगल्या एका उमेदवाराला मत तरी देऊन बघ || ७ ||
काम करायला घे आधी तू विचार करत बस मग
देशाची ह्मा जबाबदारी थोडी तरी घेऊन बघ || धृ ||