सोयीस्कर देशभक्ती
मार्च 4, 2016व्यसन
जून 17, 2016कठीण प्रश्न
सध्या प्रसारमाध्यमांचं युग सुरु आहे. टीवी, व्हॉट्सॲप, फेसबुक वगैरे माध्यमांवर अनेक प्रश्नांबाबत तावातावाने चर्चा चाललेली असते. प्रत्येकाकडे प्रत्येक प्रश्नाचं काही ना काही उत्तर असतं. आणि तरीही काही प्रश्न सोपी उत्तरं न दिल्याने कठीण होऊन बसलेले आहेत. मला पडलेले असेच काही ‘कठीण’ प्रश्न . . .
माझ्या मनात काही प्रश्न आहेत मोठे रास्त
उत्तर ज्यांचं मिळणं मोठं झालंय दुरापास्त || धृ ||
विडी सिगारेट आरोग्याला अपायकारक फार
कानीकपाळी ओरडून सांगे आपल्याला सरकार
तंबाखूचा उद्यम कैसा चाले मग निर्धास्त
उत्तर ज्याचं मिळणं मोठं झालंय दुरापास्त || १ ||
व्हॉटस्ॲपवरती वाद झाला बदलून गेलं चित्र
नाव टाकलं दोघांनी जे काल होते मित्र
वादाचं ते कारण मैत्रीहून मोठं का भासतं
उत्तर ज्याचं मिळणं मोठं झालंय दुरापास्त || २ ||
झोपडीवाला घर मागतो घरवाला बंगला
माझा पगार माझ्यासाठी कधीच नसतो चांगला
प्रत्येकाला वाटतं नशीब माझ्यावर का रूसतं
उत्तर ज्याचं मिळणं मोठं झालंय दुरापास्त || ३ ||
निवडणूकीला नेता विवरण संपत्तीचे धाडे
दरवेळी त्याची संपत्ती दुप्पट तिप्पट वाढे
आयकर खात्याला सारं ते कायदेशीर का दिसतं
उत्तर ज्याचं मिळणं मोठं झालंय दुरापास्त || ४ ||
राजेशाहीपेक्षा म्हणतात चांगली लोकशाही
राजे गेले लोक आले काही बदललं नाही
जनसेवक राजकारण्यांची अशी कशी बडदास्त
उत्तर ज्याचं मिळणं मोठं झालंय दुरापास्त || ५ ||
चोरलेला तो कोहिनूर त्यांना वाटत नाही लाज
वर आपल्याला शिकवतायत शहाणपणा ते आज
उलट्या बोंबा मारतो कैसा चोर तो बिनधास्त
उत्तर ज्याचं मिळणं मोठं झालंय दुरापास्त || ६ ||
कार्य राष्ट्रसंघाचं असतं विश्वशांततेबद्दल
पाच देश कायमचे तेथे मारून बसले फतकल
त्यांचा शस्त्रांचा धंदा कैसा सर्वांहून जास्त
उत्तर ज्याचं मिळणं मोठं झालंय दुरापास्त || ७ ||
साऱ्या धर्मांचा स्वतंत्र तो र्इश्वर असे महान
सर्व माणसे बालक त्याची त्याच्यापुढे समान
धर्माधर्मातील वैराने जीवन तरी का नासतं
उत्तर ज्याचं मिळणं मोठं झालंय दुरापास्त || ८ ||
एक नाही दोन नाही प्रश्न पडतात सत्तर
मूग गिळून बसतात ज्यांच्याकडे असतं उत्तर
जग चालतंय मी का ह्मा प्रश्नांनी होतोय त्रस्त
पण ह्मा प्रश्नाचं उत्तर देखील झालंय दुरापास्त || ९ ||
माझ्या मनात काही प्रश्न आहेत मोठे रास्त
उत्तर ज्यांचं मिळणं मोठं झालंय दुरापास्त || धृ ||