कविता

विचार

'Cogito ergo sum' अर्थात 'माझं अस्तित्व माझ्या विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे' हे रेने देकार्त ह्या थोर फ्रेंच तत्ववेत्त्याचं विधान पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा पाया मानलं जातं. आणि विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरता कवितेएवढं दुसरं प्रभावी साधन नसेल. त्यामुळे माझ्या काही कविता माझ्या विचारांवर आधारित आहेत.

जानेवारी 4, 2025

चविताक

सांकेतिक भाषा ही फक्त हेरखात्याची मक्तेदारी आहे असं कुणी सांगितलं? अगदी लहानपणी, शाळेत असतानाही सांकेतिक भाषा वापरल्या जातात. आम्ही मित्र मित्र अशीच ‘च’ची भाषा वापरायचो. मी आजही ही भाषा समजू शकतो, बोलू शकतो. तुमची होती का अशी एखादी सांकेतिक भाषा?

चशीअ चकए चषाभा चहेआ चलाति चहीना चडतो 
चैकुनअ चक्कीन चम्हीतु चटबो चलालघा चंडाततो ॥

{अशी एक भाषा आहे तिला नाही तोड 
ऐकून नक्की तुम्ही बोट घालाल तोंडात ॥}
डिसेंबर 4, 2024

खिडकी

शहरांच्या पसरण्याला एक सीमा असते. ही सीमा गाठली की मग शहरं उंचीने वाढू लागतात. दहा, तीस, सत्तर मजली इमारती. आणि मग अश्या इमारतीतील घराच्या खिडकीतून दिसतात त्या फक्त इतर खिडक्या. भावनाविरहीत, व्यक्तीनिरपेक्ष, भौमितीय खिडक्या..

नवी भव्य ती इमारत कित्येक लोक वसले
आयुष्य मात्र त्यांचे खिडकीत नाही दिसले ॥

आयुष्यभर शिदोरी जमवून घर मिळाले
ते कष्ट दो जीवांचे खिडकीत नाही दिसले ॥

परदेशी पुत्र आपुल्या मातापित्यास विसरी
कारुण्य जोडप्याचे खिडकीत नाही दिसले ॥
नोव्हेंबर 1, 2024

बावळट

मराठी माध्यमाच्या शाळेतून इंग्रजी माध्यमाच्या महाविद्यालयात गेल्यावर कानावर पडण्याऱ्या भाषांच्या कक्षा वाढल्या. नोकरी लागल्यावर काही राष्ट्रीय तर काही आंतरराष्ट्रीय भाषांची त्यात भर पडली. ह्या भाषांची समाज जरी मर्यादित असली तरी एका बाबतीत माझं मत ठाम होत चाललं आहे. ‘बावळट’सारखा अपमानजनक शब्द दुसऱ्या कोणत्याही भाषेत नसावा..

वाच्य-अर्वाच्य शिव्यांचा मराठीत तुटवडा नाही 
पण ‘बावळट’सारखा खजील करणारा दुसरा शब्द नाही ॥

हायवेवर माझ्या पुढे जाणारा म्हणतो बावळट रात्री पोहोचेल 
हायवेवर माझ्याहून हळू जाणारा म्हणतो बावळट नक्कीच मरेल 
आठदहा मिनिटांच्या फरकाने जो तो पुण्यास जाई 
पण ‘बावळट’सारखा खजील करणारा दुसरा शब्द नाही ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/OlPerJvvux4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जुलै 22, 2023

मुहूर्त

शुभकार्याकरता पंचांग पाहून मुहूर्त शोधणं जमलं नाही तर निदान साडेतीन मुहूर्तांपैकी एखादा मुहूर्त साधणं ही अगदी पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. हल्लीच्या काळातही व्यायाम, ऑफिसमधून घरी लवकर येणं, जिभेवर ताबा ठेवणं ह्याकरता नवीन वर्षाच्या मुहूर्ताची वाट पाहणारे काही अपवादात्मक नाहीत. ह्या कवितेकरताही मी एका चांगल्या मुहूर्ताच्या शोधात होतो. पण मग म्हटलं ..

मुहूर्त शोधत असशील चांगलं करण्याकरता काही
तर आजच्यासारखा दिवस शोधून सापडणार नाही ॥

ऑफिसमध्ये उशीर व्हायला कारण काही नसतं
पत्नी मुलांना घेऊन जरा फिरायला जा मस्त
कुटुंबीयांच्यासोबत एकदा काढण्या वेळ असाही
आजच्यासारखा दिवस शोधून सापडणार नाही ॥
मार्च 26, 2023

मोकळा वेळ

उतारावरून वाहणाऱ्या ओढ्याप्रमाणे माणसं बेबंद आयुष्यं जगत होती. मध्येच महामारीचा धोंडा पडला आणि पाणी काही काळाकरता शांत झालं. काही काळाने विज्ञानाच्या मदतीने हा धोंडा दूर झाला आणि मोकळा वेळ म्हणजे काय हे भान आलेली माणसं पुन्हा एकदा बेभानपणे धावू लागली. हाती असलेला वेळ अमर्याद असल्याप्रमाणे ..

तुम्हाला हल्ली मोकळा वेळ मिळतो का?

अंहं … रात्री झोपण्यापूर्वी मोजून मापून फोन आणि टीवी बघायला मिळणारा नव्हे
शनिवार रविवारी घरच्या कामाकरता मिळणारा नव्हे
वर्षातून एकदा सुट्टी घेऊन
पहाटे पाच वाजता उठायला लावणाऱ्या कण्डक्टेड टूर्समध्ये मिळणारा … तोही नव्हे

मोकळा म्हणजे खरोखर मोकळा
लहानपणी मुंग्यांची रांग बघण्याकरता मिळायचा … तसा
शाळेत उन्हाळ्याच्या सुट्टीत
वाळत घातलेल्या पापडांची राखण करताना मिळायचा … तसा
कॉलेजच्या दिवसांत स्टेशनवरून घरी रमत गमत पायी येताना मिळायचा … तसा

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/x6GTEyX2AxI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं

निवडणुका जवळ आल्या की समाजातील धृवीकरण वाढू लागतं. इतकं की समाजातील निरनिराळे घटक महामानवांनाही आपसात वाटून घेतात. मग आपल्या महामानवाचं उदात्तीकरण आणि समोरच्या महामानवाचं चारित्र्यहनन ह्याकरता शब्दांचे खेळ सुरु होतात. ते इतक्या टोकाला जातात की काही दिवसांनी ते शब्द उच्चारणाऱ्यांचा त्यावर ठाम विश्वास बसतो आणि समाजातील हे विष वाढतच जातं .. 

हाताला बोचलं की चिडून प्रत्येकाला वाटे
किती क्लेशदायक आहेत हे गुलाबपुष्पाचे काटे
आपण रंगसुवासाचं अद्भूत मिश्रण पाहावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं ॥

आई वडिलांचं वागणं कधी मनाला पटत नाही
त्याचं बोलणं कधी मनाला रूचत नाही
आपण त्यांचं आपल्यावर असलेलं निर्व्याज प्रेम आठवावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं ॥

माझी ‘चागलं तेवढं घ्यावं’ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/dkSkCB_p5Jg ह्या ठिकाणी ऐकता येईल.