मोबाईल फोन
फेब्रुवारी 4, 2011पुस्तक
एप्रिल 23, 2018पिवळे पडलेले फोटो
चपलाही न घालता खेळणं, घरी टीवी, फोन, फ्रिज नसणं, स्टेशनवरील नळातून पाणी पिणं अशा मागील पिढीने अनुभवलेल्या गोष्टी नवीन पिढीला सुरस आणि चमत्कारिक कथांप्रमाणे भासतात. आता जमाना डिजिटल फोटोग्राफीचा आहे. जुनी पिढी केवळ अल्बममध्ये चिकटवून पिवळ्या पडलेल्या फोटोंमध्ये बंदिस्त आहे . . .ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/LZQ4XaMfkME ह्या ठिकाणी ऐकता येईल.
उन्हात खेळलो असता नसे बाधत यू वी लाइट
मातीतच व्हायची तेव्हा मित्रांशीही फाइट
रस्त्यावरती क्रिकेट खेळता बाॅल गटारात जार्इ
रस्त्यावरच आपटून सुकवून खेळ सुरू होर्इ
ऊन असो की पाऊस असो प्रत्येक ऋतू आपला
खेळण्यासाठी कोणीच घालत नसत तेव्हा चपला
घरी कधी बसलोच तर पत्ते व्यापार डाव
कॉम्प्युटरच्या गेम्सचं तेव्हा ऐकलं नव्हतं नाव
आता वाटतं खरंच का हो आपण असे होतो
जसे पिवळे पडलेले अल्बममधले फोटो || १ ||
रस्त्यावरची शेवपुरी अन् भेळ वडापाव
पौष्टिक गुणधर्मांना तेव्हा नव्हता का हो भाव
प्लॅस्टिकच्या पिशवीतला बर्फ असे पेप्सी कोला
त्याहून स्वस्त काडीवरचा बर्फाचा तो गोळा
पिण्याकरता पाणी सगळीकडे नळ असत
पैसे पाण्याचे मागितले तर लोक हसत
काही खायचो काही प्यायचो बिनधास्त होती दुनिया
अस्तित्त्वातच नव्हते बहुधा तेव्हा बॅक्टेरिया
आता वाटतं खरंच का हो आपण असे होतो
जसे पिवळे पडलेले अल्बममधले फोटो || २ ||
शाळेत जायला टाळलं तरी शिजत नसे डाळ
पण एखाद दिवशी शाळा बुडली कोसळत नसे आभाळ
ट्रेन किंवा बसमधून जायचं दप्तर जपत
गाडी घ्यायला कोणाच्या बापाची नव्हती ऐपत
पालक शिक्षक यांचं भेटणं असा पायंडा नव्हता
नो न्यूज इज गुड न्यूज असा कायदा होता
शाळेत जाणं तेव्हासुद्धा अपरिहार्यच असे
पण मराठी माध्यम सांगतानाही लाज वाटत नसे
आता वाटतं खरंच का हो आपण असे होतो
जसे पिवळे पडलेले अल्बममधले फोटो || ३ ||
घरी नोकर चाकर उगीच नव्हते उठता बसता
आपणच पिटाळले जायचो काही आणायचं असता
आर्इवडिलांनी चोपलं घरी कुरवाळायची आजी
शोधलीच नव्हती कोणी तोवर चाइल्ड सायकॉलॉजी
वाचन भरपूर गोट्या चिंगी फास्टर फेणे खास
मिळे बघायला टीवी तेव्हा फक्त दोन तास
कोणत्याच घरी नव्हता तेव्हा साधा काळा फोन
घरोघरी पण आपली आवड आणि रेडिओ सिलोन
आता वाटतं खरंच का हो आपण असे होतो
जसे पिवळे पडलेले अल्बममधले फोटो || ४ ||
सिजलर्स नव्हते पित्झा नव्हते नव्हते हॅमबर्गर
सतराशे साठ चॅनल्स नव्हती नव्हते कॉम्प्युटर
जीन्स टी शर्ट नव्हते आणि नव्हत्या बॉक्सर शॉर्ट्स
विमानप्रवास नव्हता आणि नव्हत्या इतक्या कार्स
मायक्रोवेव ए सी नव्हते नव्हतं वॉशिंग मशीन
इंटरनेट नव्हतं आणि नव्हते मोबाइल तीन
नक्की ठाऊक आहे आपण मागासलेले नव्हतो
पण आपण जगलो कसे मुलांना असा प्रश्न पडतो
आता वाटतं खरंच का हो आपण असे होतो
जसे पिवळे पडलेले अल्बममधले फोटो || ५ ||