पुस्तक
एप्रिल 23, 2018चॉकलेट
जागतिक चॉकलेट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! युरोपमध्ये म्हणे आजच्या दिवशी चॉकलेटचं आगमन झालं. असो… आपल्याला काय करायचंय! चॉकलेट खाण्याकरता आपल्याला निमित्त पुरतं. आबालवृद्धांना आवडणारा हा पदार्थ कधी खावा हे सांगणारी ही जंत्री…
उशीर जाहला करताना दाढी ।
चुकली गाडी चॉकलेट खावे ॥
कधी ऑफिसला येता लवकर ।
आणुनी रुचकर चॉकलेट खावे ॥ १ ॥
बॉस जाचतो कामाचा भार ।
कुठलाही वार चॉकलेट खावे ॥
होई कौतुक वाढे पगार ।
फेडुनी उधार चॉकलेट खावे ॥ २ ॥
असेल घरी पत्नी कजाग ।
रिचवुनी राग चॉकलेट खावे ॥
पत्नी प्रेमळ रंगली रंगे ।
तिच्याच संगे चॉकलेट खावे ॥ ३ ॥
मुले खट्याळ अभ्यास नाही ।
अंगाची लाही चॉकलेट खावे ॥
मुलांच्या करिता घरी आणुनी ।
हळू चोरुनी चॉकलेट खावे ॥ ४ ॥
खर्च वाढले धन चणचण ।
खर्चुनी पण चॉकलेट खावे ॥
अशी अवचित लागे लॉटरी ।
करण्या साजरी चॉकलेट खावे ॥ ५ ॥
कुठलाही खेळ भारत हरता ।
मॅच सरता चॉकलेट खावे ॥
खेळी कोणत्या जिंके भारत ।
नाच करत चॉकलेट खावे ॥ ६ ॥
जाई आजारी तोंडाची चव ।
करिता आर्जव चॉकलेट खावे ॥
आजार जाता तोंडाला चव ।
नको आर्जव चॉकलेट खावे ॥ ७ ॥
वाढे वजन करा उपास ।
पण झकास चॉकलेट खावे ॥
वजन घटता मनी संतोष ।
करुनी जल्लोष चॉकलेट खावे ॥ ८ ॥
वय जाहले बाल्य आठवे ।
मुलांच्या सवे चॉकलेट खावे ॥
वयाचे काय आकड्यांचा खेळ ।
मिळता वेळ चॉकलेट खावे ॥ ९ ॥
जीवन खडतर मनात चिंता ।
सोडविण्या गुंता चॉकलेट खावे ॥
जीवन सुंदर मिळे एकदा ।
सदासर्वदा चॉकलेट खावे ॥ १० ॥
काही कारण मिळते जेव्हा ।
आणुनी तेव्हा चॉकलेट खावे ॥
मिळत नाही कारण जेव्हा ।
आणुनी तेव्हा चॉकलेट खावे ॥ ११ ॥
मध्यमवर्गीयाला जग दबंग ।
लिहुनी अभंग चॉकलेट खावे ॥
जग असू दे नको वादंग ।
लिहुनी अभंग चॉकलेट खावे ॥ १२ ॥