चुटपुटती ती भेट
जून 27, 2020वाळवी
सप्टेंबर 15, 2020लोकमान्य
आज लोकमान्य टिळकांची शंभरावी पुण्यतिथी आहे. असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या ह्या लोकोत्तर पुरुषाला वकिल, गणितज्ञ किंवा शास्त्रज्ञ ह्यापैकी कोणत्याही क्षेत्रात धनसंचय करता आला असता. परंतु आपले देशबांधव दारिद्र्यात आणि अज्ञानात खितपत पडलेले असताना ते करणं त्यांनी नाकारलं आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजकारणात प्रवेश केला. अशा ह्या असामान्य व्यक्तिमत्त्वाला एक अल्पशी श्रद्धांजली…ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/uM_DD1-Fmh4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
स्वराज्य माझा हक्क ज्यापुढे विकल्प नाही अन्य
जनमानस जाणून वागले करारी लोकमान्य ॥ धृ ॥
गंगाधरपंतांचा मुलगा केशव ज्याचे नाव
‘बाळ’ म्हणवितो स्मरून आईचे वात्सल्याचे भाव
शिकून अवघा बघता बघता झाला बालिस्टर
धनसंचय करण्यास तयाला होता मोठा वाव
त्यजून सुखाला देशभक्तीचे स्वीकारले अरण्य
जनमानस जाणून वागले करारी लोकमान्य ॥ १ ॥
इंग्रज वरचढ ठरतो कारण अथक तयाचे कर्म
संघटित उद्योजकता हे भरभराटीचे मर्म
शिक्षण आणिक लोकजागृतीस वाहून घेती स्वत:ला
रूजवती कितिक संस्था सिंचून रक्त आणखी घर्म
आळस होता त्यांच्याकरता अपराध तो जघन्य
जनमानस जाणून वागले करारी लोकमान्य ॥ २ ॥
सहकारी ऐसे जमले ते हुशार अन् तरबेज
न्यू इंग्लिश शाळेचे पुण्यात वाढू लागले तेज
विचारस्वातंत्र्याच्या खाणी केसरी अन् मराठा
उच्च शिक्षणासाठी स्थापिले फर्ग्युसन कॉलेज
आजही कार्यप्रवण असती ह्या संस्थाच असामान्य
जनमानस जाणून वागले करारी लोकमान्य ॥ ३ ॥
भारतीय संस्कृतीला होते मनात मोठे स्थान
वर्तनात अन् परंपरांचा वसला दुराभिमान
सुधारकांशी मतभेदांचे मोहोळ कायम उठले
पण तत्त्वांसाठी कधी न केला वैयक्तिक अपमान
देशोन्नतीच्या विचारास नेहेमी दिधले प्राधान्य
जनमानस जाणून वागले करारी लोकमान्य ॥ ४ ॥
राजकारणही केले ठेवून वृत्ती बाणेदार
वचकून होते शत्रू ओळखून शब्दांमधली धार
विचार होते सडेतोड अन् भाषेवरी प्रभुत्व
नवल नसे जर खार खाऊनी बसे क्रुद्ध सरकार
वाभाडे काढले कायद्यांचे जे जनी अमान्य
जनमानस जाणून वागले करारी लोकमान्य ॥ ५ ॥
स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हती वर्ज्य कुठलीही कृती
परिणामस्वरूप कारावासही भोगण्यास अनुमती
स्वत: अहिंसक होते चर्चा करण्यावर विश्वास
क्रांतिकारी नेत्यांना तरीही होती सहानुभुती
स्वातंत्र्याच्या चळवळीस तो आधार सर्वमान्य
जनमानस जाणून वागले करारी लोकमान्य ॥ ६ ॥
गणितामध्ये होते त्यांना विशेषरूप स्वारस्य
अधिकाराने पुराणांवरही केले होते भाष्य
थोर व्यासंग होता म्हणूनी तुरूंगात राहूनी
लिहून काढला अलौकिक तो ग्रंथ गीतारहस्य
मिळता समय जाहले असते संशोधक सन्मान्य
जनमानस जाणून वागले करारी लोकमान्य ॥ ७ ॥
इंग्रज पाहती भले स्वत:चे ह्या देशाचे नव्हे
नोकरशाही अत्याचारी स्वत: इंग्रज नव्हे
जाणून होते पिचलेल्या जनतेची करूण कहाणी
इलाज असतो रोगाकरता रोग्याकरता नव्हे
चकित पाहूनी झेप बुद्धीची आंग्ल ते अहंमन्य
जनमानस जाणून वागले करारी लोकमान्य ॥ ८ ॥
लोकाभिमुख मते म्हणूनी जहाल त्यांना म्हणती
विलग जाहले नाइलाज राष्ट्रीय सभेतून अंती
जनतेला संघटित करण्या ध्यास घेतला मनी
गणेश उत्सव सुरू करविले आणखीन शिवजयंती
समाजातले जाऊ लागले अकर्म औदासिन्य
जनमानस जाणून वागले करारी लोकमान्य ॥ ९ ॥
परकीयांच्या टाचेखाली भारत होता बद्ध
सतत गर्जले स्वराज्य माझा हक्क तो जन्मसिद्ध
हार न माने बलाढ्य इंग्रज सत्तेपुढती केव्हा
स्वराज्य मिळण्यापूर्वीच हरले मृत्यूसंगे युद्ध
लाभे लोकोत्तर हा नेता भाग्य आपुले धन्य
जनमानस जाणून वागले करारी लोकमान्य ॥ १० ॥
स्वराज्य माझा हक्क ज्यापुढे विकल्प नाही अन्य
जनमानस जाणून वागले करारी लोकमान्य ॥ धृ ॥