सकाळ संध्याकाळ
ऑक्टोबर 1, 2020जगपंचायत
ऑक्टोबर 24, 2020रडू
आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. ‘शीः रडतोयस काय मुलींसारखा’ ह्या लहानपणी ऐकलेल्या वाक्यापासून पुरुषांचा एक कोरडा प्रवास सुरु होतो. आपल्याकरता बावळट, भेकड अशी शेलकी विशेषणं वापरली जातील ह्या सामाजिक भीतीपोटी पुरुष रडणं आधी दडपतात आणि मग विसरूनच जातात. पुरुषांमध्ये मानसिक आजारांचं प्रमाण जास्त असण्यामागे ही भीती तर नसेल …ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/hzXP-T5AFp4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
परीक्षेतला पेपर पाहून मला भरत असे धडकी
साफ विसरून जायचो सारं मुद्रा व्हायची रडकी
वर्गात होत्या मुली रडण्या होती मनाई सक्त
आयुष्यात एकदा तरी रडायचंय मनसोक्त ॥
हॉस्टेलमध्ये चाले रॅगिंग व्हायचा मला त्रास
कधी कधी तर वाटून जायचं लावून घ्यावा फास
दाखवत असे मी कणखरपणा आलं जरी मग रक्त
आयुष्यात एकदा तरी रडायचंय मनसोक्त ॥
आईवडील गेले निमित्त झालं अपघाताचं
भावंडांना पाहून सांत्वन केलं मी मनाचं
कर्ता झाले होतो शिक्षण संपलं होतं नुकतं
आयुष्यात एकदा तरी रडायचंय मनसोक्त ॥
लहान होता मुलगा माझा झाली होती कावीळ
बायकोचंही काळीज तुटत होतं तीळतीळ
रडून चालत नाही कितीही बाका आला वख्त
आयुष्यात एकदा तरी रडायचंय मनसोक्त ॥
माझ्या नकळत मोठी झाली होती काल लहान
मनातले कढ मनात रिचवून केलं कन्यादान
अश्रूंचा आधार आईला मी तर बापच फक्त
आयुष्यात एकदा तरी रडायचंय मनसोक्त ॥
सुखी कुटुंबावरती आमच्या नजर फिरवतो काळ
ओढून नेलं पत्नीस माझ्या कोसळलं आभाळ
मुलांना पाहून आवरलं मन जे झालं होतं रिक्त
आयुष्यात एकदा तरी रडायचंय मनसोक्त ॥
कधी पुरूष तर मोठा भाऊ कधी बाप खंबीर
जगायचं आयुष्य सर्वांसाठी बांधून डोळ्यांतील नीर
डोळ्यांमधील अश्रूंचं धरण मग डोळ्यांमागेच सुकतं
संपूनच गेली आहे शक्ती आता रडायची मनसोक्त ॥