प्राक्तन
मार्च 13, 2023तुळस
जून 5, 2023मोकळा वेळ
उतारावरून वाहणाऱ्या ओढ्याप्रमाणे माणसं बेबंद आयुष्यं जगत होती. मध्येच महामारीचा धोंडा पडला आणि पाणी काही काळाकरता शांत झालं. काही काळाने विज्ञानाच्या मदतीने हा धोंडा दूर झाला आणि मोकळा वेळ म्हणजे काय हे भान आलेली माणसं पुन्हा एकदा बेभानपणे धावू लागली. हाती असलेला वेळ अमर्याद असल्याप्रमाणे ..ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/x6GTEyX2AxI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
तुम्हाला हल्ली मोकळा वेळ मिळतो का?
अंहं … रात्री झोपण्यापूर्वी मोजून मापून फोन आणि टीवी बघायला मिळणारा नव्हे
शनिवार रविवारी घरच्या कामाकरता मिळणारा नव्हे
वर्षातून एकदा सुट्टी घेऊन
पहाटे पाच वाजता उठायला लावणाऱ्या कण्डक्टेड टूर्समध्ये मिळणारा … तोही नव्हे
मोकळा म्हणजे खरोखर मोकळा
लहानपणी मुंग्यांची रांग बघण्याकरता मिळायचा … तसा
शाळेत उन्हाळ्याच्या सुट्टीत
वाळत घातलेल्या पापडांची राखण करताना मिळायचा … तसा
कॉलेजच्या दिवसांत स्टेशनवरून घरी रमत गमत पायी येताना मिळायचा … तसा
सतत भुंगा … काय करत होतो, काय करतोय, काय करायचं आहे
केव्हा केव्हापासून केव्हापर्यंत
एक मालगाडी … न संपणारी
दोन डब्यांच्या फटीतून दिसणारं पलीकडचं दॄष्य
लक्षात येण्यापूर्वीच पुढचा डबा …
कधी घराच्या खिडकीतून आकाशातील ढग पाहिले आहेत?
कधी घरात जमिनीवर लोळत सीलिंगवरची जळमटं पाहिली आहेत?
कधी आपल्याच मळहातावरच्या केसांची रचना पाहिली आहे?
वेळेचा पिझ्झा … वाटून दिलेला
कुटुंब ऑफिस मित्र घरची कामं करमणुक प्रवास …
तुकडे … काही लहान तर काही मोठे
दोन त्रिकोणांमध्ये पडलेला चुरा … मोकळा वेळ!
वेळेची परिमाणं … दिवस महिने वर्षं वाढत गेले
आणि वेळ मात्र हरवून गेला … सुखात यशात पैशात