जन्मठेप
मे 15, 2020माझी शाळा
जून 12, 2020माया
जागतिक पर्यावरणदिनाच्या शुभेच्छा! निसर्ग ज्या निरिच्छ वृत्तीने आपल्याला सारं काही देत असतो ती निरिच्छ वृत्ती आपल्याला केवळ आपल्या पालकांमध्ये – आपल्या माता-पित्याने आपल्यावर केलेल्या मायेमध्ये दिसून येते. त्यामुळे निसर्गाला आपले माता किंवा पिता समजून त्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. झाडं आपल्यावर जी माया करतात ती काही औरच असते…ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/RSxdr7pp4HU ह्या ठिकाणी ऐकता येईल.
घराभोवती माळ होता शुष्क आणि ओसाड
माळावर त्या एकच होते बहरलेले झाड ॥ धृ ॥
घरामध्ये राहात होता मुलगा छान गोंडस
मित्र नव्हते कोणी त्याला राहायचा उदास
कंटाळून तो झाडापाशी गेला एक दिवस
झाड म्हणाले खेळू आपण दोघे चल बिनधास
मित्र नव्हते दोघांनाही जमली त्यांची गट्टी
जातो कैसा वेळ संगती दोघांना ना कळे
झोपायचा तो पानफुलांच्या मऊ शय्येवरती
भूक लागता झाड तयाला खाण्या देई फळे
हट्टी होता मुलगा झाड करी त्याचे लाड
माळावर त्या एकच होते बहरलेले झाड ॥ १ ॥
वर्षं गेली काही आता मुलगा झाला मोठा
एके दिवशी झाडापाशी येऊन बसे उदास
परदेशी गेलो तर नाही व्यापाराला तोटा
सातसमुद्रापार करावा पण कैसा प्रवास
झाड म्हणालं माझ्या फांद्या घेऊन बनव होडी
तुझ्या सुखाला कारण होईन आहे तुजला मुभा
माझ्यासंगे राहील तुझिया आठवणींची गोडी
गरज लागता फिरून ये रे आहे इथेच उभा
कापून फांद्या बनवून होडी झाला नजरेआड
माळावर त्या एकच होते बहरलेले झाड ॥ २ ॥
वर्षं उलटली एके दिवशी फिरून झाडापाशी
उदास वदनी येऊन बसला खाली घालून मान
विचारले तर म्हणतो पैसा आहे माझ्यापाशी
बांधायाला घरकुल माझे मिळत नाही सामान
झाड म्हणाले माझे लाकुड नक्की येईल कामी
वापरून ते घरकुल आपुले बांध आता लवकर
वॄद्धपणाने तसाच आता झालो मी कुचकामी
मिळेल तुझिया कुटुंबीयांना डोक्यावर छप्पर
घरकुल त्याचे बांधून देण्या झाले झाड उजाड
माळावर त्या एकच होते बहरलेले झाड ॥ ३ ॥
अशीच काही वर्षं उलटली वृद्ध एक आला
झाडाने पाहीले तयाला लगेच ओळख पटली
पैसाअडका खूप मिळाला सुख नाही मनाला
आयुष्यभर मी झटत राहीलो मन:शांती पण रूसली
झाड म्हणाले देण्यासाठी काहीच नाही आता
माझ्यासंगे येऊन बस पण दमला असशी फार
सांग मला तू तुझी कहाणी ऐकून घेईन व्यथा
निचरून जाईल दु:ख तुझे अन् हलका होईल भार
बुंध्यापाशी बसून बोले उघडुन हृदय सताड
माळावर त्या एकच होते बहरलेले झाड ॥ ४ ॥
माता पिताच असती आपुल्या आयुष्यातली झाडे
निःस्वार्थाने अपत्यास जे सतत करती साहाय्य
जितुके संकट मोठे आपुले तितुके ममत्व वाढे
कसेही वागो अपत्य तरीही आटत नाही औदार्य
आपुल्या सुखात सुख शोधुनी दु:खं विसरती सारी
झिजून जाती कण कण देण्या अपत्यास आनंद
त्यागाची जाणीव ठेवणे आपुली जबाबदारी
जपून ठेवा जोपासा ते मायेचे अनुबंध
सिंचून आपुल्या प्रेमाजळाने जपावे जिवापाड
माळावरचे जोपासा ते बहरलेले झाड ॥ ५ ॥
घराभोवती माळ होता शुष्क आणि ओसाड
माळावर त्या एकच होते बहरलेले झाड ॥ धृ ॥